परभणी : नांदेड परिक्षेत्रातील अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी एकाच दिवशी कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा नाश केला. नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि.१९) मासरेड राबविली. यामध्ये एकूण १६७ दारूबंदी केसेस नोंदवून सुमारे ५.६८ लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मासरेड मोहिमेत नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यात एकाच वेळी पोलिसांनी छापेमारी केली. यामध्ये हातभट्टी दारू, देशी व विदेशी दारू, तसेच दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ६१ केसेस नोंद करण्यात आल्या. यात २,५६५ लिटर हातभट्टी दारू, १,२८० लिटर रसायन, ६९९ देशी दारूच्या बाटल्या, ४८० लिटर सिदी जप्त करून अंदाजे ३.१४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. परभणी जिल्ह्यात ३५ केसेस करून ३६ आरोपी अटक केले. २१ लिटर हातभट्टी, १२० लिटर रसायन, ४६२ देशी दारू बाटल्या जप्तीतून एकूण ४४,५१० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील ४२ कारवायातून ६९८ देशी दारूच्या बाटल्या, १० लिटर हातभट्टी असा एकूण ५४,१६० चा मुद्देमाल तर लातूर जिल्ह्यातील २९ प्रकरणे उघड झाले असून २,९१० लिटर हातभट्टी दारू, २ हजार लिटर रसायन, २१४ देशी व २५ विदेशी दारू बाटल्या जप्त करून सर्वाधिक ५.६८ लाखांचा मुद्देमाल लातूरमध्ये जप्त करण्यात आला.
ही कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, परभणीचे रवींद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे श्रीकृष्ण कोकाटे, लातूरचे प्रभारी पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहीमेत एकूण १४७ पोलीस अधिकारी व ६६३ अंमलदार सहभागी झाले. यामध्ये पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक निरीक्षक, गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस यांचा समावेश होता.