बालाजी पेटेकर
आदमपूर: माणसाच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीचे वेड... त्याविषयी असली निश्चिम भक्ती...आणि ते मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेल्या एका साहित्यिकांची ही अद्भुत कहाणी...
बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील युवा कवी, गीतकार, चिञकार व पञकार जाफर फक्रूशा आदमपूरकर यांनी सलग तब्बल अठरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांची अनोखी शब्दवारी अनुभवलेली आहे. निमित्त ऐतिहासिक स्वराज्याची राजधानी सातारा शहरात भरलेल्या शतकपूर्व ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. त्यात आदमपूर येथील युवक जाफर आदमपूरकर यांनी यंदाही आपला मराठी रसिकरूपी सारस्वत सहभाग नोंदवून आपल्या 'जाफर का सफर' ची प्रचिती सर्वांना दिलेली आहे.
ठाणे, महाबळेश्वर, उदगीर, घुमान (पंजाब), दिल्ली आदि मराठी संमेलनातून कवीकट्टा सदरातून त्यांनी कवितावाचन ही सादर केले आहे. नामवंत चिञपट व साहित्य, सांस्कृतिक, राजकीय व्यक्तिमत्त्वांसह प्रत्यक्ष भेट घेत अनोखा स्वाक्षरी संग्रह ही एकञित केला आहे. हा प्रेरक साहित्यप्रवास सन २००८ सालात सांगली संमेलनापासून सुरू झाला. आतापर्यंत सांगली, महाबळेश्वर, पुणे, ठाणे, चंद्रपूर, चिपळून, सासवड, घुमान (पंजाब), पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, बडोदा(गुजरात), उस्मानाबाद, नाशिक, उदगीर, वर्धा, अमळनेर, दिल्ली आणि आता सातारा आदि मराठी संमेलनात ते उपस्थित राहिले आहेत.आगामी एक कवितासंग्रह ही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते नांदेड शहरात खाजगी कोचिंग क्लासेसही चालवतात. त्यांच्या या 'जाफर का सफर'चे सर्वत्र कौतुक होत आहे.