नायगाव : सुसाट वेगातील बुलेट दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या लोखंडी कठड्याला धडकून पेट घेतल्याची थरारक घटना गडगा–कहाळा रोडवर मांजरमजवळील धोकादायक वळणावर रविवारी सायंकाळी घडली. या भीषण अपघातात बुलेटवरील दोन युवक गंभीर जखमी झाले असून दुचाकी काही क्षणांत पूर्णतः जळून खाक झाली.
प्राप्त माहितीनुसार, लोहा तालुक्यातील सोनखेड येथील दोन युवक एमएच-२६-सीएल-६६१० क्रमांकाच्या बुलेटवरून गडगा–कोलंबी–कहाळा मार्गे नांदेडकडे जात होते. मांजरम शिवारातील संजय विश्वंभर पाटील शिंदे यांच्या शेता जवळील वळणावर येताच दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि बुलेट रस्ता सोडून थेट लोखंडी कठड्यावर जाऊन धडकली. धडकेच्या जोरात दोन्ही युवक हवेत उडून दूर फेकले गेले.
धडक लागताच बुलेटने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच बुलेट पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात दोन्ही युवकांच्या हातापायांना जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळाजवळील शेतकऱ्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. जखमी युवकांना प्राथमिक मदत करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, मांजरम येथील वळण अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची बाब समोर आली आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.