Mandvi Rural Hospital Financial Fraud File Photo
नांदेड

Nanded News: मांडवी ग्रामीण रुग्णालयात ३.२० कोटींचा अपहार; ‘सेवार्थ’ प्रणालीचा गैरवापर, तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकाला अटक

‘सेवार्थ’ प्रणालीचा गैरवापर करून ३ कोटी २० लाख ९९ हजार ९५३ रुपयांचा शासकीय निधी स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात वळता केल्याप्रकरणी तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम राठोड यांना अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nanded News

किनवट : मांडवी येथील ग्रामीण रुग्णालयात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्त्यांची देयके तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘सेवार्थ’ प्रणालीचा गैरवापर करून मूळ वेतन थकबाकीच्या नावाखाली बनावट देयके तयार करीत तब्बल ३ कोटी २० लाख ९९ हजार ९५३ रुपयांचा शासकीय निधी स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात वळता केल्याचा आरोप तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम दासराव राठोड (वय ४८) यांच्यावर आहे. या कथित आर्थिक अपहारप्रकरणी त्यांना नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. २६) कनकी येथून अटक केली. शुक्रवारी (दि. २७) किनवट येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मांडवी ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. जी. लोकडे हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम राठोड यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यासोबतच रुग्णालयातील वेतन व अन्य शासकीय देयकांची बिले काढणे आणि ती रक्कम संबंधितांना अदा करण्याचे अधिकारही देण्यात आले होते. या पदावर कार्यरत असताना जुन्या ‘सेवार्थ’ प्रणालीतील माहिती नव्या प्रणालीत स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान वेतन थकबाकीच्या बनावट नोंदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

जून २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मूळ वेतन थकबाकी अर्थात ‘बेसिक एरियर्स’च्या नावाखाली बनावट देयके तयार करून ती किनवट येथील उपकोषागार कार्यालयात सादर करण्यात आली. या देयकांच्या आधारे ३ कोटी २० लाख ९९ हजार ९५३ रुपयांची शासकीय रक्कम डॉ. राठोड यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा झाल्याचे आरोग्य विभागाच्या चौकशीत आढळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

जिल्हा कोषागार अधिकारी, नांदेड यांच्या पत्रानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आरोग्य सेवा उपसंचालक, लातूर मंडळामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या आधारे नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून २८ जुलै २०२६ रोजी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला मांडवी पोलिसांकडे असलेला तपास प्रकरणाचे गांभीर्य आणि आर्थिक व्यवहारांची व्याप्ती लक्षात घेऊन महिनाभरापूर्वी नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

तपासादरम्यान संबंधित बँक खात्यांची विवरणपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून, साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. आता कथित अपहाराची रक्कम नेमकी कुठे वळती झाली, अन्य व्यक्ती अथवा नातेवाइकांच्या खात्यांचा वापर करण्यात आला का, तसेच या रकमेतून मालमत्ता खरेदी करण्यात आली का, याचा तपास केला जाणार आहे. कथित बनावट देयके तयार करण्यासाठी वापरलेली कागदपत्रे, संगणक, लॅपटॉप, मोबाईल व अन्य साहित्य जप्त करण्याबरोबरच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जाणार आहे.

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सुमारे १९ कोटी ५० लाख रुपयांच्या कथित अपहाराचे प्रकरण ताजे असतानाच आरोग्य विभागातील हा प्रकार समोर आल्याने शासकीय निधीच्या आर्थिक व्यवहारांच्या देखरेखीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन. बी. कुंडगीर, प्रकाश शिरामे व त्यांचे पथक करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT