Mahur water crisis pudhari photo
नांदेड

Mahur water crisis : 22 गावांत पाणीटंचाई

माहूर तालुक्यातील चित्र ; नागरिकांतून संताप व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

वसंत कपाटे

श्रीक्षेत्र माहूर ः तालुक्यातील तब्बल 22 गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून या संकटावर मात करण्यासाठी संबंधित विभाग मात्र केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता प्रमोद बनसोडे यांनी 2 मार्च रोजी विविध गावांतील नळ योजना विशेष दुरुस्ती व तात्पुरत्या पूरक नळ योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद नांदेड येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे पाठविले होते. मात्र या प्रस्तावाला तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच 30 एप्रिल रोजी मान्यता मिळाली. परंतु, या विलंबामुळे आधीच गंभीर झालेली पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे.

दरम्यान, वानोळा, कुपटी, साकूर, वाई बाजार, चोरड, नाईकवाडी, भोरड खेडी, अजनी, सावरखेड (फ्लोराईडग्रस्त), मलकागुडा तांडा, जेमला नाईक तांडा आदी गावांतील नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी व तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, प्रशासकीय दिरंगाई आणि ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे प्रत्यक्ष कामांना अद्याप गती मिळालेली नाही.

विशेष म्हणजे, मागील वर्षी वानोळा गावातील नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेला सुमारे 10 लाख रुपयांचा निधी खर्च न झाल्याने आजही त्या गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. यावरून संबंधित यंत्रणेच्या निष्क्रियतेचा प्रत्यय येतो.

दरम्यान, मंजुरी मिळाल्यानंतर उपअभियंता बनसोडे यांनी सर्व 22 ग्रामपंचायतींकडून करारनामा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आतापर्यंत केवळ दोनच ग्रामपंचायतींनी करारनामा सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे उर्वरित गावांतील पाणीपुरवठा कामे अजूनही रखडलेली आहेत.

एकीकडे जलजीवन मिशनची कामे रखडलेली, तर दुसरीकडे दुरुस्तीच्या कामांनाही विलंब होत असल्याने ग्रामीण भागातील पाणी संकट दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

आमच्या कार्यालयाने 2 मार्च रोजी पाठवलेल्या अंदाजपत्रकाला 30 एप्रिल रोजी मान्यता मिळाली. त्यानुसार 22 गावांच्या ग्रामपंचायतींकडून करारनामा मागवला आहे. मात्र, आजपर्यंत फक्त दोनच ग्रामपंचायतींनी करारनामा सादर केला आहे.
प्रमोद बनसोडे, उपअभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT