मुखेड: आधी अतिवृष्टीचा फटका आणि आता महावितरणचे दुर्लक्ष, अशा दुहेरी संकटात सलगरा खुर्द (ता. मुखेड) येथील शेतकरी सापडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गावातील कृषी पंपाचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) नादुरुस्त असल्याने रब्बी हंगामातील पिके पाण्याविना जळून जात आहेत. "आले महावितरणच्या मना, तिथे शेतकऱ्याचे काही चालेना" अशी विदारक स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची कसर भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने हरभरा, गहू आणि ज्वारीची पेरणी केली. विशेष म्हणजे जवळच असलेल्या मन्याड नदीला मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, वीज पुरवठा करणारे रोहित्र बंद असल्याने पिकांना पाणी देता येत नाहीये. त्यामुळे डोळ्यांदेखत हिरवीगार पिके करपू लागली आहेत.
शासनाच्या नियमानुसार, कृषी पंपाचे रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते १५ दिवसांच्या आत बदलून मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सलगरा खुर्द येथे दोन महिने उलटूनही नवीन रोहित्र मिळालेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, शेजारील नंदगाव (प.क.) येथे तातडीने रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले, मग सलगरा खुर्दवरच हा अन्याय का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. वशिला लावणाऱ्या किंवा 'चिरीमिरी' देणाऱ्यांनाच तातडीने सेवा दिली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
"महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. रब्बी पिकांना जीवदान देण्यासाठी त्वरित नवीन रोहित्र बसवावे, अन्यथा होणाऱ्या नुकसानीला महावितरण जबाबदार असेल," अशी आक्रमक मागणी सलगरा खुर्दचे माजी सरपंच अविनाश देशमुख व प्रल्हाद डांगे यांनी केली आहे. आश्वासनांच्या पलीकडे जाऊन महावितरणने तातडीने कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे, हीच आता या भागातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.