महाशिवरात्री : शिवतत्त्वाच्या अनुभूतीचा जागर file photo
नांदेड

महाशिवरात्री : शिवतत्त्वाच्या अनुभूतीचा जागर

ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा

पुढारी वृत्तसेवा

Mahashivratri: Awakening to the Realization of Shiva Principle

किनवट, पुढारी वृत्तसेवा : सृष्टीच्या आदिम तत्त्वाचे, ध्यान-योगाच्या अखंड परंपरेचे आणि संहारातून नवसृजन घडविणाऱ्या चेतनेचे प्रतीक असलेले आदियोगी शिव यांच्या स्मरणाने महाशिवरात्रीचा पावन सोहळा रविवारी (दि. १५) किनवट शहर व संपूर्ण तालुक्यात अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची ही रात्र अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि अस्थिरतेतून शांततेकडे नेणारी आध्यात्मिक साथ-नेची रात्र मानली जाते.

शैव तत्त्वज्ञानानुसार हे केवळ देवतेचे रूप नसून योग, ध्यान, संयम आणि आत्मजागृतीचे मूर्त तत्त्व आहे. शिव म्हणजे शून्य आणि पूर्णत्व यांचा संगम; सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिकालात्मक प्रक्रियेचे केंद्र. पुराणपरंपरेनुसार याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, तसेच समुद्रमंथनावेळी शिवाने हलाहल विष प्राशन करून विश्वाचे रक्षण केले. त्यामुळे महाशिवरात्री ही रात्र त्याग, संतुलन आणि विश्वकल्याणाच्या भावनेची प्रतीक मानली जाते.

किनवट शहरातील कैलासधाम, पैनगंगा तीरावरील शिवमंदिर, नर्मदेश्वर महादेव मंदिर आदी ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांची रिघ लागली होती. रुद्राभिषेक, जल व दुग्धाभिषेक, बेलपत्र व पुष्प अर्पण करून शिवपूजन करण्यात आले. यज्ञ, हवन, सामूहिक महाआरती तसेच भजन-कीर्तन कार्यक्रमांनी मंदिर परिसर शिवमय झाला होता. 'शिवमहिम्न स्तोत्र', 'शिवतांडव स्तोत्र' आणि 'शिवलिलामृत' पठणाने भक्तीचा स्वर अधिकच दाटला.

तालुक्यातील रामायणकालीन उनकेश्वरचे प्राचीन शिवमंदिर, नागडोह येथील सुप्रसिद्ध शिवमंदिर, सहस्त्रकुंड येथील शंकर मंदिर, मदनापूर येथील सोमेश्वर महादेव मंदिर तसेच अंबाडी येथील हेमाडपंती शिवमंदिर येथेही सकाळपासून अभिषेक व पूजाविधी पार पडले. अनेक ठिकाणी दिवसभर स्वतंत्र अभिषेक व्यवस्था करण्यात आली होती. उपवास, जप, ध्यान आणि रात्रभर जागरणाच्या माध्यमातून भक्तांनी अंतर्मनातील शिवतत्त्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला.

महाशिवरात्री ही केवळ बाह्य उपासनेची नव्हे, तर आत्मशुद्धी आणि ईशचेतनेच्या जागृतीची संधी असल्याची भावना सर्वत्र दिसून आली. जसे शिवलिंगावर अभिषेक करून पावित्र्याचा अनुभव घेतला जातो, तसेच अंतर्मनातील अज्ञान, अहंकार आणि नकारात्मकता दूर करून आत्मप्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश या पर्वातून दिला जातो.

शिवमय वातावरण, हर हर महादेवचा घोष आणि श्रद्धाभावाने नतमस्तक झालेले भाविक यामुळे किनवट शहर व तालुक्यातील महाशिवरात्रीचा सोहळा आध्यात्मिक उर्जेचा आणि सामूहिक भक्तीभावाचा अनुपम संगम ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT