नायगाव : एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 'बालिका दिन' म्हणून उत्साहात साजरी करत असताना, नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ६० वर्षीय नराधमाने अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याने संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालवंडी येथील पीडित ८ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी तुळशीराम विठ्ठल इंगळे (वय ६०) याने तिला फूस लावून तिच्याच आजोबांच्या बंद असलेल्या घरात नेले. तिथे त्याने चिमुकलीवर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या भयावह परिस्थितीतही चिमुकलीने प्रसंगावधान राखले आणि नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत तिथून पळ काढला.
घाबरलेल्या अवस्थेत मुलीने घरी जाऊन रडत रडत सर्व घडलेला प्रकार आईला सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी तात्काळ नायगाव पोलीस ठाणे गाठले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपी तुळशीराम इंगळे याला लालवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपीवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात, बालिका दिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. हे कृत्य म्हणजे सावित्रीबाईंच्या विचारांना काळिमा फासणारे आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या नराधमाला कठोरात कठोर शासन व्हावे, जेणेकरून अशा प्रवृत्तींना जरब बसेल, अशी मागणी देखील ग्रामस्थांनकडून करण्यात आली आहे.