नांदेड-हैदराबाद महामार्गावर गगनबीड फाट्या जवळ उंच डोंगरावर शेकडो वर्षापूर्वी वसलेले शिव अन् पार्वतीचे तर काहीच्या मते हरि हराचे एकत्रित असलेले ठिकाण म्हणजे उंच शिखरावरचे गगनातील गंगणबीड शासकीय दप्तरी (तलबीड) अशी नोंद असलेले गाव होय. येथील प्रसिद्ध महादेव मंदिर देवस्थान हे प्रति शिखर शिंगणापूर म्हणुन ओळखले जाते .येथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची आलोट गर्दी जमा होते. गर्दीची संख्या लक्षात घेऊन चोख पोलिस बंदोबस्त लावून भाविकांचे दर्शन सुरळीत पार पाडण्यासाठी समिती नेहमी प्रयत्नशील असते.
नरसी नायगाव पासून अवघे ७ की मी. तर नांदेडपासून केवळ ४० किमी अंतरावर गगनबीड फाटा आहे. याठिकाणी गंगणबीड हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. डोंगरावरील सपाट भागावर असलेल्या या मंदिराची तीन शिवेवर असल्याची ख्याती आहे. सुगाव, निळेगव्हाण, गगनबीड हे महादेव मंदिर सर्वांचे श्रद्धेचे स्थान असल्याने येथे श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीला लाखो भाविक भेट देतात.
येथील चिंतामणी हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी या मंदिराची आख्यायिका असून, इच्छा पूर्ण करणारा शंभू महादेव असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. माळरानावर वसलेले हे मंदिर निसर्गरम्य वातावरणात आहे. या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक,तेलंगणा,विदर्भ,सह मराठवाड्यातील व इतर राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. गंगणबीड येथील शंभू महादेवाची मूर्ती ही स्वयंभू आहे. येथील शिवलिंग मूर्तीवर शिव व पार्वती एकत्र विराजमान असल्याचे भाविक सांगतात तर काहींच्या मते हरि हरा भेद नाही असे सांगून येथील शिवलिंगाला विशेष महत्त्व देऊन दर्शन घेण्यासाठी प्रयत्न करतात.
मोठा महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर शिंगणापूर येथील मंदिरात पूजेवेळी गंगणबीड येथील शंभू महादेवाचा उल्लेख केला जात असल्याचे येथील पुजाऱ्यांनी व काही जुने जाणते भक्त यांनी सांगितले आहे. या महादेव मंदिराला प्रतिशिंगणापूर सुद्धा म्हटले जाते. तर दरवर्षी प्रमाणे येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंदिराची अख्यायिका हरि हराची असल्याने किंवा महादेव म्हणजेच शंकर असल्याने येथे शिव नाम ऐवजी अखंड हरिनाम सप्ताह होतो. महाशिवरात्रीच्या उपवास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी २७ रोजी दिवसभर महाप्रसाद तर रात्री ह.भ प सचिन महाराज ढोले यांचे कीर्तन होणार आहे. तर २८फेब्रुवारी रोजी ह.भ प शिवानंद शास्त्री पैठणकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल.