Nanded News
नायगाव: तालुक्यातील मांजरमवाडी शिवारात सोमवारी (दि.२२) रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून शेतकरी मारुती माणिका छपरे यांच्या शेतातील कडब्याची गंजी जळून खाक झाली. या दुर्घटनेत जनावरांच्या चाऱ्याचा मोठा साठा नष्ट झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही
रात्री पावसासह सुरू असलेल्या विजांच्या कडकडाटात अचानक वीज थेट कडब्याच्या गंजीवर कोसळली. काही क्षणांतच गंजीने पेट घेत आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत संपूर्ण कडबा जळून राख झाला होता.
यंदा आधीच पावसाने दडी मारल्याने शेतकरी पेरणीच्या चिंतेत आहे. अशातच नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा साठा नष्ट झाल्याने मारुती छपरे यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. संबंधीत महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. पेरणीची अनिश्चितता आणि चाऱ्याचा तुटवडा यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
वीजेच्या या दुर्घटनेमुळे एका शेतकऱ्याच्या जनावरांचा चारा पूर्णपणे नष्ट झाला आहे. अशा वेळी परिसरातील काही शेतकऱ्यांनी शक्य त्या प्रमाणात चाऱ्याची मदत करू, अशी भावना व्यक्त केली आहे. संकटाच्या काळात इतर शेतकऱ्यांनी, सामाजिक संस्था व दानशूर नागरिकांनीही पुढाकार घेऊन चाऱ्याची मदत केल्यास मारुती छपरे यांना मोठा दिलासा मिळू शकतो. ग्रामीण भागातील माणुसकीची ही परंपरा पुन्हा एकदा जपण्याची वेळ आली आहे.