Leopard Attacks Humans and Cattle in Naigaon  Pudhari
नांदेड

Leopard Attack Naigaon | नायगाव तालुक्यात बिबट्याचा उच्छाद; दोन नागरिकांवर हल्ले, कालवड, हरणाचा फडशा

Nanded News | नागरिक, शेतकरी, मजूर व विद्यार्थी दहशतीखाली

पुढारी वृत्तसेवा

Leopard Attacks Humans and Cattle in Naigaon

नायगाव : नायगाव तालुक्यात मागील एक महिन्यापासून बिबट्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून दोन नागरिकांवर हल्ले करत एका कालवडीसह हरणाचा फडशा पाडला आहे. एवढ्या गंभीर घटना घडूनही बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आले असून त्यामुळे तालुक्यात भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे. नागरिक, शेतकरी, मजूर व विद्यार्थी दहशतीखाली जीवन जगत असून वनविभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दि. २९ नोव्हेंबर रोजी नायगाव तालुक्यातील कृष्णूर एमआयडीसी परिसरात बिबट्याचे प्रथम दर्शन झाले. यावेळी आक्रमक बिबट्याने एका कारखान्यातील कामगारासह एका वनकर्मचाऱ्यावर हल्ला करून दोघांनाही जखमी केले. या घटनेनंतरही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली.

यानंतर जवळपास वीस दिवसांनी दि. २० डिसेंबर रोजी रानसुगाव येथील शेतकरी रावसाहेब जाधव यांच्या शेतात बांधलेल्या कालवडीचा बिबट्याने फडशा पाडला. सलग दोन दिवसांत दि. २३ डिसेंबर रोजी मुस्तापूर येथील हनुमंत नेमाळे यांच्या शेतालगत असलेल्या पुलाजवळ बिबट्याने हरणाची शिकार करून आपले अस्तित्व पुन्हा एकदा ठळकपणे दाखवून दिले.

कृष्णूर, रानसुगाव व मुस्तापूर या तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याने शेतात कामासाठी जाणारे शेतकरी व मजूर भीतीच्या छायेत वावरत आहेत. पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनेक गावांत बिबट्याचे दर्शन झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

बिबट्या कॅमेऱ्यात कैद होत असतानाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तो जेरबंद करता येत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ वनाधिकारी व स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी नेमके काय करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. बिबट्याला तात्काळ जेरबंद न केल्यास संभाव्य जीवितहानीची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT