नांदेड : कुटुंबात दोनपेक्षा महिला व वयाच्या निकषात न बसणाऱ्या एकूण ९२ हजार ९०२ महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत करण्यात आली होती. यात ७८ हजार ४०७ बहिणी आता पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या खात्यावर लाभ जमा होणार आहे. उर्वरित १४ हजार ४९५ मात्र अपात्र ठरल्या आहेत.
सरकारने विविध कारणांमुळे निकषात न बसणाऱ्या महिलांची कागदपत्रांची छाननीची मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यातील तब्बल ९२ हजार ९०२ महिलांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सोपवली होती. याद्यांची पडताळणी करण्याचे काम अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी केल्यानंतर एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभ घेणारे कुटूंब आढळून आले. शिवाय, २१ पेक्षा कमी वय असणाऱ्या व ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेत पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे या महिलांना महिन्याकाठी मिळणारे दीड हजार रुपये आता बंद होणार आहेत. अपात्र ठरलेल्यांकडून यापूर्वी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहे का नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.
ॲप व पोर्टल अद्याप बंदच
२१ वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना नारीशक्ती दूत ॲप व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या पोर्टलवर अर्ज करण्याची सोय शासनाने केली होती. मात्र, हे अॅप व पोर्टल मागील आठ महिन्यांपासून बंदच आहे. त्यामुळे २१ वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना अर्जही करता येईना झाले आहेत.
रेशन कार्डवरून ठरवले होते अपात्र शासनाने पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांची माहिती मागवली होती. तसेच तंत्रज्ञानाच्या माहितीवरून वयाच्या निकषाची माहिती जमवून ९२,९०२ बहिणींना अपात्र ठरवले होते. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या घरी जाऊन फेर सर्वेक्षण केले. एकाच कुटुंबातील आई व मुलगी लाभघेत आहेत ? २१ वर्षांवरील मुलीचा विवाह झाला आहे का? याची खात्री केली. त्यानंतर फेर सर्वेक्षणात ७८ हजार ४०७ बहिणी योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. महिला व बालकल्याण विभागाने याची माहिती शासनाला पाठवली असून त्यांच्या खात्यावर मदत जमा होण्यास सुरुवात होणार आहे असे सूत्रांनी सांगितले.