theft Pudhari
नांदेड

Nanded theft news | कोलंबी येथे धाडसी चोरी; 1.5 लाखांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने लंपास

तोंडावर बेशुद्धीकारक स्प्रे फवारून ही चोरी करण्यात आली आहे

पुढारी वृत्तसेवा

बाळासाहेब पांडे

नायगाव : तालुक्यातील कोलंबी येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील सदस्यांवर बेशुद्धीकारक स्प्रे मारून अंदाजे दीड लाख रुपयांची रोकड, सुमारे पावणे तीन तोळे सोने व अर्धा किलो चांदीचे दागिने लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोलंबी येथील रहिवासी साईनाथ गणपती पोतलवाड यांच्या घरी ही चोरी झाली. घरातील काही सदस्य वरच्या मजल्यावर झोपले होते, तर काही जण बाहेरगावी गेले होते. दरम्यान, घरात लग्नासाठी नव्याने आणलेले जोडपेही वास्तव्यास होते. कुलरच्या आवाजामुळे दुसऱ्या खोलीत सुरू असलेल्या हालचालींचा घरातील सदस्यांना सुगावा लागला नाही.

चोरट्यांनी घरात प्रवेश करून खाली झोपलेल्या गणपती पोतलवाड व प्रदीप पोतलवाड यांच्या तोंडावर बेशुद्धीकारक स्प्रे फवारला. त्यानंतर घरातील मौल्यवान ऐवजावर हात साफ केला. चोरीनंतर चोरट्यांनी गावातील आणखी एका दुकानाचे कुलूप तोडल्याची माहिती समोर आली आहे. या चोरीत अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांची रोकड, सोन्याच्या अंगठ्या, कानातील दागिने, लग्नात भेट मिळालेल्या पाच ग्रॅमच्या अंगठ्या, तसेच चांदीचे दागिने, मुलांचे वाळे, दंडसाखळ्या आदी वस्तू चोरीस गेल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिंगरप्रिंट तज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले असून, या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT