अरुण तम्मडवार
किनवटः शेती व शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना अधिकृत शेतकरी ओळख मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीला किनवट तालुक्याने नांदेड जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. तालुक्यात आजपर्यंत २३ हजार ७६५ महिलांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले असून, त्यापैकी १ हजार ६५२ महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने ही नोंदणी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शेतीत महिलांचा मोठा सहभाग असूनही जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव नसल्यामुळे अनेक महिलांची स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख प्रस्थापित होण्यात अडचणी येतात.
ही बाब लक्षात घेऊन महिला शेतकरी प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी १७ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत पात्र महिलांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
या व्यवस्थेत केवळ स्वतःच्या नावावर शेतजमीन असलेल्या महिलांपुरती पात्रता मर्यादित नाही. भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, शेतमजूर तसेच दुग्धव्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, फलोत्पादन, बीजोत्पादन आणि शेतीमाल प्रक्रिया यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांत प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या महिलांचाही समावेश होऊ शकतो.
यासाठी संबंधित महिलेचे वय किमान १८ वर्षे असणे आणि राज्यात शेती किंवा शेतीपूरक क्षेत्रात किमान एका हंगामात कार्यरत असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतीतील महिलांच्या प्रत्यक्ष श्रमांना अधिकृत मान्यता मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
प्रमाणपत्रामुळे संस्थात्मक कृषिकर्ज, पीकविमा, अनुदान योजना, कृषी निविष्ठा, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि बाजारपेठेशी संबंधित सुविधांचा लाभ घेणे सुलभ होऊ शकते. मात्र, प्रमाणपत्र मिळाल्याने प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ आपोआप मिळत नाही; संबंधित योजनेचे स्वतंत्र पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाची छाननी आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया नियमानुसार केली जाते. ग्रामसभा किंवा नगरपंचायतीच्या बैठकीत अर्जावर निर्णय घेतला जातो आणि ठरावानंतर प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे.
नांदेड जिल्ह्यातही या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून, उपलब्ध जिल्हास्तरीय आकडेवारीनुसार २ लाख ०४ हजार ३६९ महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २३ हजार ४७४ महिलांची प्रमाणपत्रे तयार झाली आहेत. या पार्श्वभूमीवर नोंदणीच्या संख्येत किनवट तालुक्याने घेतलेली आघाडी महत्त्वाची ठरते. मात्र, अर्ज केलेल्या सर्व महिलांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्जांची छाननी, आवश्यक पडताळणी आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
किनवट तालुक्यात महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होत आहेत. शेती आणि शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष काम करणाऱ्या पात्र जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. कोणतीही पात्र महिला केवळ माहितीअभावी किंवा अर्ज प्रक्रियेतील अडचणींमुळे वंचित राहू नये, यासाठी संबंधितांनी कृषी विभागाकडून मार्गदर्शन घ्यावे.चंद्रकांत निमोड,तालुका कृषी अधिकारी, किनवट