Kinwat rain update pudhari photo
नांदेड

Nanded monsoon news : पावसाच्‍या १४ दिवसांच्या खंडाने बळीराजा धास्तावला

किनवट : आकडेवारी समाधान देत असली तरी शेतात मात्र ओलाव्याचा ताण

पुढारी वृत्तसेवा

किनवट : तालुक्यात यंदा आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी पावसाच्या असमान वितरणामुळे खरीप पिकांसमोरील संकट कायम आहे. १ जूनपासून १४ ऑगस्टपर्यंत नऊ महसूल मंडळांत ५ हजार ८०२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरी ६४४.७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

आजपर्यंत अपेक्षित ४८६.७० मिलिमीटरच्या तुलनेत हे प्रमाण १०४.०३ टक्के आहे. मात्र, या पावसाचा मोठा हिस्सा जून-जुलैतील चार अतिवृष्टीच्या घटनांमध्ये एकवटला असून, ३१ जुलैनंतर तब्बल १४ दिवस अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे आकडेवारी समाधान देत असली, तरी शेतात मात्र ओलाव्याचा ताण जाणवू लागला आहे.

किनवट तालुक्याची १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील वार्षिक सरासरी १,०२६.५८ मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत ६४४.७५ मिलिमीटर म्हणजेच ६२.८० टक्के पाऊस झाला आहे. जूनमध्ये ३० दिवसांपैकी १३ दिवस, तर जुलैमध्ये ३१ दिवसांपैकी १७ दिवस पाऊस झाला. ९ जूनला जलधारा येथे १२९ व शिवणी येथे ६६ मिलिमीटर, २९ जूनला मांडवी येथे ७८ व उमरीबाजार येथे ७२ मिलिमीटर पाऊस झाला.

३० जुलैला सिंदगी-मोहपूर व उमरीबाजार येथे प्रत्येकी ६६ मिलिमीटर, तर ३१ जुलैला सात महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात मांडवी २३९.८, दहेलीबाजार १९४.५ आणि उमरीबाजार २५१.५ मिलिमीटर पावसाने अक्षरशः झोडपले गेले. १ जूनपासून मांडवीत दोनदा, तर उमरीबाजारात तीनदा अतिवृष्टी झाली आहे.

मंडळनिहाय पावसात मोठी तफावत दिसून येते. उमरीबाजार येथे सर्वाधिक ८७४.१० मिलिमीटर, तर किनवट येथे सर्वात कमी ५१९.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. उमरीबाजारात अपेक्षित पावसाच्या १४१.१ टक्के, तर किनवटमध्ये केवळ ८३.८ टक्के पाऊस झाला. बोधडी ८४.४, इस्लापूर ८७.७, शिवणी ८९.३ आणि जलधारा ९१.३, मांडवी १३२.९, दहेली ११५.९, सिंदगी ११०.३ टक्क्यांवर आहेत. त्यामुळे तालुक्याची सरासरी अधिक असली, तरी अनेक भागांत अपेक्षित पावसाची तूट कायम आहे.

ऑगस्टच्या १४ दिवसांत केवळ सात दिवस तुरळक अथवा हलक्या सरी झाल्या असून सात दिवस पाऊस पूर्णपणे बेपत्ता आहे. जुलैअखेरच्या अतिवृष्टीनंतर आलेला हा दीर्घ खंड कापूस, सोयाबीन,ज्वारी,मका आणि तूर या खरीप पिकांसाठी चिंतेचा ठरत आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने पुढील काही दिवस पाऊस न झाल्यास हलक्या जमिनीतील पिकांवर ताण वाढण्याची शक्यता आहे.

  • गत दोन वर्षांत तुलनेने अधिक पावसाची ठरलेली जलधारा, शिवणी व इस्लापूर यंदा अपेक्षित सरासरीच्या खाली आहेत. याउलट उमरीबाजार, मांडवी व दहेलीबाजारमध्ये अतिवृष्टीमुळे पर्जन्यमानाचा आकडा मोठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाचे वैशिष्ट्य ‘सरासरीपेक्षा अधिक पाऊस’ नसून ‘मोठ्या खंडानंतर एकाचवेळी अतिवृष्टी’ हे ठरत आहे. आता वार्षिक सरासरीपेक्षा पुढील काही दिवसांत पडणारा पाऊसच किनवटच्या खरीपाची दिशा ठरवणार आहे. आकडेवारीत पाऊस ‘सरासरीपेक्षा अधिक’; प्रत्यक्ष शेतात मात्र पावसाची ‘सातत्याची कमतरता’ हीच यंदाच्या आतापर्यंच्या किनवटच्या पावसाची खरी कहाणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT