किनवट : यंदा तालुक्यात खरीप हंगामात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०३.४९ टक्के पेरणी झाली; मात्र पावसाचा दीर्घ खंड, सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
जिरायत, बागायत आणि फळपिकांचे मिळून ७१ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची नोंद कृषी व महसुलच्या संयुक्त अहवालात करण्यात आली आहे. या नुकसानीमुळे तालुक्यातील ५८ हजार ६५४ शेतकरी बाधित झाले असून, पंचनामे शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या आर्थिक मदतीकडे लागले आहे.
तालुका कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार, खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ७७ हजार २७८ हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी ७९ हजार ९७५.५० हेक्टरवर झाली. पेरणीचे प्रमाण सर्वसाधारण क्षेत्राच्या १०३.४९ टक्के होते. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २१ हजार ९६८ हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी २४ हजार ७७३ हेक्टरवर झाली.
तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र सहा हजार २७३ हेक्टर असून, पेरणी सात हजार ३१५ हेक्टरवर झाली. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४५ हजार ७३८ हेक्टर असताना ४३ हजार ६०५ हेक्टरवर पेरणी झाली. म्हणजेच पेरणीच्या टप्प्यावर प्रमुख पिकांचे क्षेत्र मोठे होते; परंतु त्यानंतरच्या प्रतिकूल पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.
पीक हानीच्या अहवालानुसार, जिरायत पिकांचे ६९ हजार ५७१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ५५ हजार ५२० शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. बागायत पिकांचे एक हजार ७०२ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असून, तीन हजार ४८ शेतकरी बाधित आहेत. फळपिकांचे ३४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ८६ शेतकऱ्यांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. या तिन्ही प्रकारांतील बाधित क्षेत्राची एकत्रित व्याप्ती ७१ हजार ३०७ हेक्टर आहे.
जिरायत पिकांमध्ये कपाशीचे ३९ हजार ६४६ हेक्टर आणि सोयाबीनचे २२ हजार ४१२ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रात नोंदविण्यात आले आहे. तुरीचे सहा हजार ४१६ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे अहवालात नमूद आहे.
याशिवाय मक्याचे ३९६, ज्वारीचे ६४, उडदाचे ३०३ आणि इतर पिकांचे ३३४ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त आहे. बागायत पिकांत हळदीचे एक हजार ५४३.२० हेक्टर आणि उसाचे १५३.८० हेक्टर क्षेत्र बाधित आहे.
फळपिकांच्या गटात आंबा, पपई, चिकू आणि इतर फळपिकांच्या क्षेत्राचेही नुकसान नोंदविण्यात आले आहे.
६२ कोटींच्या मदतीचा अंदाज
नुकसान अहवालात नमूद केलेल्या प्रतिहेक्टरी मदतीच्या दरांनुसार, जिरायत पिकांसाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये याप्रमाणे ५९ कोटी १३ लाख ५३ हजार ५०० रुपये, बागायत पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये याप्रमाणे दोन कोटी ८९ लाख ३४ हजार रुपये, तर फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये याप्रमाणे सात लाख ६५ हजार रुपये, अशी एकूण ६२ कोटी १० लाख ५२ हजार ५०० रुपयांची राज्य शासनाकडून अपेक्षित मदत अहवालात दर्शविण्यात आली आहे.
ही रक्कम अहवालातील दरांनुसार काढलेला अंदाज असून, प्रत्यक्ष मदतीची पात्रता, मंजुरी आणि वितरणाबाबत शासनाच्या अंतिम निर्णयानंतरच स्पष्टता येईल. पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता बाधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक दिलासा किती लवकर मिळतो, हा कळीचा प्रश्न आहे.
पाच हजारांच्या अग्रिमची प्रतीक्षा....
पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. खरीप हंगामातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याने मदत मिळण्याची अपेक्षा वाढली असली, तरी शासनाकडून अपेक्षित असलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम रकमेची प्रतीक्षा कायम आहे. रब्बी हंगामाची तयारी, शेतीसाठी लागणारा खर्च आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे पंचनाम्यांनंतर मदत वितरणाची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, याकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.