जीवन घोगरे मारहाणप्रकरणी अखेर एसआयटी स्थापन ! pudhari photo
नांदेड

Jeevan Ghogare Case : जीवन घोगरे मारहाणप्रकरणी अखेर एसआयटी स्थापन !

आ.चिखलीकर व त्यांच्या गटाला ‌‘संक्रांत भेट‌’

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड ःराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या सांगण्यावरून त्यांचे पक्षांतर्गत विरोधक जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण करणे व त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी संक्रांतीच्या पूर्वसंध्येस जारी केलेला आदेश नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत असताना समाजमाध्यमांतून बाहेर आला. निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस येथे आले असता घोगरे यांनी त्यांची नांदेड विमानतळावर भेट घेऊन चिखलीकर व त्यांच्या समर्थकांनी केलेला ‌‘प्रताप‌’ त्यांच्या कानी घातला होता. या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही झाली.

एसआयटी प्रमुखांना तपासात सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, पीएसआय सुनील बुलंगे तसेच गजानन कदम व विठ्ठल शेळके या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती वरील आदेशान्वये करण्यात आली. घोगरे मारहाणप्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 22 डिसेंबर रोजी भारतीय न्यायसंहितेतील वेगवेगळ्या कलमांखाली 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर त्यांना अटकही झाली; पण ठाणेप्रमुखांनी घोगरे यांच्या तक्रारीतील तीन जणांचा आरोपींमध्ये समावेश केला नव्हता.

मनपा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांनी सिडको भागात घेतलेल्या शेवटच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी चालविलेल्या गुंडगिरीचा जोरकसपणे समाचार घेतला होता. सिडकोतील प्रचारदौऱ्यात त्यांनी घोगरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुख्यमंत्री फडणवीस आणि घोगरे यांची भेट घडवून आणण्याचे नियोजनही चव्हाण यांनीच केले होते. त्यानंतर एसआयटीच्या स्थापनेसाठी त्यांनी पाठपुरावाही केला.

जीवन घोगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस आहेत. त्याआधी त्यांनी पक्षाचे महानगराध्यक्षपद सांभाळले; पण पक्षातर्फे आमदार होताच चिखलीकर यांनी त्यांना पदावरून हटविले. राजकीय वैमनस्यातून घोगरेंवर प्राणघातक हल्ला झाला; पण निवडणूक प्रचारानिमित्त दोनदा नांदेडला येऊन गेलेले प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी त्यांची साधी विचारपूसही केली नाही.

मुख्य सूत्रधार शोधा !

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी माझ्या निवेदनाची दखल घेऊन एसआयटी स्थापन केली. आता त्वरित चौकशी सुरू करून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधावा, निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी आणि यापुढे अशा गुंडगिरीचे प्रकार घडू नयेत, याचा बंदोबस्त करावा असे जीवन घोगरे पाटील यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT