उमरखेड : पेनगंगा प्रकल्पातील इसापुर धरणात ७५ टक्के पाणीसाठा झाल्याने नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पेनगंगा प्रकल्प उपविभाग क्रमांक १, पेनगंगा (ता. पुसद, जि. यवतमाळ) कार्यालयाकडून यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.
इसापुर धरणात आज (दि.२८) सकाळी ८ वाजेपर्यंत ७२५.६८८ दशलक्ष घनमीटर (७५.२७%) पाणीसाठा नोंदवला गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरू शकते. त्यामुळे पेनगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांमध्ये प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. हा केवळ प्राथमिक इशारा असून, पुढील निर्णय पावसाच्या स्थितीनुसार घेतले जातील, असे अधीक्षक अभियंता एस. डी. खडके यांनी स्पष्ट केले आहे.
धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून, पुढील काही दिवसांत पाणी विसर्गाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, ३१ जुलै २०२५ पर्यंत धरण ९१.४३ टक्के (८८४.१२ दशलक्ष घनमीटर) भरू शकते. पावसाचा जोर आणि नदीत येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
नदिकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास, तात्काळ माहिती संबंधित ग्रामपंचायत, पोलीस, महसूल व इतर यंत्रणांमार्फत कळविण्यात येईल. तसेच, व्हॉट्सअॅप गटांद्वारेही सूचना दिल्या जातील.
नदिकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी.
प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूत्रांमार्फत मिळणाऱ्या सूचनांना प्रतिसाद द्यावा.