छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. विधानसभेसोबतच येत्या २० नोव्हेंबरला या जागेची पोट निवडणूकही होणार आहे. त्यामुळे नांदेडमधून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी नांदेडमधील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे, अशी माहिती गुरुवारी (दि. १७) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली.
तसेच या पदाधिकाऱ्यांनीच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु याबाबत पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेच अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगरमधून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देणार, अशी घोषणा दीड महिन्यापूर्वीच एमआयएमचे अध्यक्ष, खासदार बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी केली होती. मात्र खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे या रिक्त जागेतून एमआयएमने निवडणूक लढवावी, अशी मागणी नांदेडच्या एमआयएम पदाधिकाऱ्यांकडून पक्षाकडे करण्यात आली आहे. त्याबाबतची एक पोस्ट आणि व्हिडिओही गुरुवारी एमआयएम कार्यकर्त्यांसह अनेकांच्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
याबाबत जलील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे त्यात काही तथ्य असेलच. नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाल्याने तेथील एमआयएम पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी या जागेवर निवडणूक लढवा, असा अग्रहही आपल्याला केला असल्याचे जलील यांनी सांगितले. मात्र ही कार्यकत्यांची इच्छा असून पक्षाचे अध्यक्ष खासदार वें. ओवेसी हे जे आदेश देतील, त्यानुसार सर्वकाही होईल. त्यांनी लोकसभा पोटनिवडणूक लढवावी, असे सांगितले तर नांदेडमधून लढणार. त्यांनी जर विधानसभाच लढा म्हणाले तर विधानभाच लढवू. दोन्ही लढवावे, असे सांगितले तर दोन्हीकडून उभे राहू, असेही जलील म्हणाले.