फुलवळ (प्रतिनिधी : धोंडीबा बोरगावे)
कंधार तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने मोहीम अधिक कडक केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 15 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री उशिरा महसूल पथकाने धडक कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा हायवा टिप्पर पकडला. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे आणि तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नायब तहसीलदार रेखा चामनर मॅडम यांच्या नेतृत्त्वाखाली पथक क्रमांक 3 व पथक क्रमांक 6 चे कर्मचारी रात्री गस्त घालत होते. रात्री सुमारे 11.55 वाजता त्यांना संशयास्पद रीतीने वाळू वाहतूक करणारा MH44 U 1299 क्रमांकाचा हायवा टिप्पर दिसला. वाहन थांबवताच त्यामध्ये बेकायदेशीर वाळू भरलेली असल्याचे समोर आले. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी कैलास मोरे, शिपाई शिवराज लघुळे आणि वाहनचालक मिर्झा समीर बेग यांनी सक्रिय सहभाग घेतला.
तपास करून पाहता सदर हायवा हा प्रदीप डिकळे (रा. लोहा) यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले. हा हायवा मारतळा (ता. लोहा) येथून कौठा मार्गे मुखेड (ता. मुखेड) या दिशेने विना परवाना वाळू वाहतूक करत होता. महसूल पथकाने योग्य वेळी कारवाई करून वाहनाला कौठा (ता. कंधार) येथे अडवले.
अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने अशा वाहनांवर कडक नजर ठेवण्याचे आदेश आधीच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
वाहन अडवल्यानंतर पथकाने जप्त प्रक्रिया पूर्ण केली. अंदाजे 5 ब्रास वाळू असल्याचा पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यावेळी नायब तहसीलदार रेखा चामनर, ग्राम महसूल अधिकारी कैलास मोरे, शिपाई शिवराज लघुळे आणि वाहनचालक मिर्झा समीर बेग उपस्थित होते. कारवाईनंतर हायवा टिप्परला ताब्यात घेऊन तो तहसील कार्यालय, कंधार येथे जमा करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही महसूल विभागाकडून चालू आहे.
कंधार, लोहा आणि मुखेड भागात अवैध वाळू वाहतूक हा गंभीर प्रश्न बनला आहे. नदीपात्रातून अनधिकृतरीत्या रेती काढून ती विविध मार्गांनी बाहेर पाठवली जाते. प्रशासनाने अशा वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली असून मध्यरात्रीही गस्त सुरू आहे. या कारवाईमुळे गैरकृत्य करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. महसूल विभागाचे पथक ज्या प्रमाणात सक्रिय झाले आहे, त्यातून अवैध वाळू माफियावर आळा येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.