हदगाव : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध मटका व जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बेकायदेशीर धंद्यांमुळे अनेक युवक, कष्टकरी, शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार व्यसनाधीन होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. परिणामी अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची खंत महिलांसह सुज्ञनागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अधिक माहितीनुसार, हदगाव शहरातील आठवडी बाजार परिसर ,एस.टी.बसस्थानकासमोरील टपऱ्या, उमरखेड ऑटो पॉईंट तसेच जुन्या शहरासह इतर काही ठिकाणी मटक्याचे बुक्की मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विशेष म्हणजे, पोलीस स्टेशनपासून अगदी काही अंतरावरच असलेल्या आठवडी बाजारात नगरपालिकेने छोट्या व्यावसायिकांसाठी बांधलेल्या गाळ्यांचा वापर मटक्याच्या अड्ड्यांसाठी होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. या ठिकाणी ‘मुंबई’, ‘कल्याण’, ‘मिलन डे’ अशा नावांनी दिवस-रात्र मटका घेतला जात असल्याचे सांगितले जाते.
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथे मटका खेळणाऱ्यांची गर्दी होत असल्याने परिसरातील नागरिकांना तसेच महिलांना रस्त्याने ये-जा करणेही कठीण झाले आहे. या अवैध धंद्यांमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मटक्याच्या नादामुळे अनेकांचे जीवन ‘ओपन जेऊ देईना आणि क्लोज झोपू देईना’ अशा अवस्थेत आले आहे. तरीही स्थानिक पोलीस प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.काही ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादानेच हे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.अनेक ठिकाणी जुगारांचे अड्डेदरम्यान, हदगाव तालुक्यातील पाथरड, कोळी तसेच शहरातील काही भागांत शेडमध्ये जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
या जुगारासाठी विविध ठिकाणांहून युवक,शेतकरी आणि व्यापारी वर्गातील लोकांना फोनद्वारे बोलावले जाते.जुगार चालविण्यासाठी एक स्वतंत्र टोळी कार्यरत असल्याचेही सांगितले जाते. जुगाराच्या नादाला लागलेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असून या प्रकारामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत. त्यामुळे अशा अवैध मटका व जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.