सेनगाव: अवैध धंदे चालवणाऱ्यांविरोधात सेनगाव पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलिसांनी ९ आणि १० जानेवारीच्या मध्यरात्री 'सळो की पळो' करून सोडणारी मोहीम राबवली. या कारवाईत गुटखा आणि रेती माफियांवर मोठी टाच आणत तब्बल २३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातून रिसोड मार्गे सेनगाव हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध गुटख्याची तस्करी होणार होती. सेनगाव पोलिसांच्या पथकाने सापळा रचून रात्रभर पाळत ठेवली आणि संशयित वाहनांवर झडप घातली. या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून संबंधित माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केवळ गुटखाच नव्हे, तर तालुक्यातील रेती घाटांवरून चोरट्या मार्गाने वाळू उपसा करणाऱ्या दोन रेती माफियांवरही पोलिसांनी कठोर कारवाई केली. या दुहेरी कारवाईमुळे अवैध धंदे चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सलगच्या कारवाईमुळे आता पानटपऱ्यांवरही गुटखा मिळणे कठीण झाले असून अवैध धंदे पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे.
ही यशस्वी मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, डीवायएसपी राजकुमार केंद्रे आणि पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत पीएसआय रविकिरण खंदारे, हेड कॉन्स्टेबल थिटे व जाधव, पोलीस कॉन्स्टेबल ओमनाथ राठोड व गायकवाड, चालक अंभोरे या पथकाने धाडसी कामगिरी केली. सेनगाव पोलिसांच्या या 'दबंग' कारवाईमुळे जिल्ह्याभरात पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण झाला आहे.