Dr Shankarrao Chavan Medical College pudhari photo
नांदेड

Nanded kidney surgery : मूत्रपिंडाच्या रुग्णांना शासकीय रुग्णालय ठरतेय आधार

अतिशय जोखीम असलेल्या किचकट शस्त्रक्रियेनंतर रुग्ण झाला ठणठणीत

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : कोणत्याही टप्प्यावरील मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मोठा आधार ठरले आहे. दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या एका ५३ वर्षीय रुग्णांवर अतिशय मोठी जोखीम स्विकारून डॉक्टरांनी नुकतीच किचकट अशी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आणि रुग्णाला जीवदान दिले. त्यामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजार झाल्यास रुग्ण सहसा खाजगी रुग्णालय गाठले जाते. पण आता मूत्रपिंडाच्या कोणत्याही स्टेजवर असलेले रुग्ण शासकीय रुग्णालयात हमखास बरे होत आहेत. नुकताच असाच एक सुखद अनुभव विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आला.

हिमायतनगर तालुक्यातील शिवाजी पाटील (नाव बदले आहे) या रुग्णाचे मूत्रपिंड पूर्णत: खराब झाले, तर दुसरे मूत्रपिंड ९० टक्के फेल झाले होते. शिवाजीची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने नातेवाईकांनी त्याला सरळ नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

Obstructive uropathy म्हणजे लघवीच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने मूत्रपिंडाचे कार्य बंद पडण्याची स्थिती होती. तसेच रक्तातील पोटॅशियम वाढल्यामुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये गंभीर बिघाड होऊ दम लागत होता. त्याला श्वासही घेणे अवघड होते. रुग्णाची गंभीर परिस्थिती पाहून अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे यांनी रुग्णाची पाहणी करून उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. शीतल राठोड, पथक प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. कपिल मोरे, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ़. सुरज चव्हाण, डॉ. फरूकी रफे, सहायक प्राध्यापक डॉ. मोहन भंडारे, डॉ. देविदास बंटेवाड, किडनीविकार तज्ज्ञ डॉ. आकाश पवार, डॉ. आयुषी पायघन, डॉ. अभिजीत कदम यांनी जातीने उपचार केले. रुग्णाची सीटी स्कॅन, एमआरआय डायलीसीस केले.

मेडिसीन विभागाने रुग्णाची गंभीर परिस्थिती ओळखून अनेकवेळा डायलीसीस प्रक्रिया केल्यामुळेच रुग्ण ऑपरेशनसाठी तयार करता आला. रुग्णावर केवळ उपचारच केला नाही तर, रुग्ण आणि नातेवाईकांना धीरही दिला. कुटुंबप्रमुख असलेल्या रुग्ण शिवाजीची ऑपरेशननंतर प्रकृती सुधारत आहे. ऑपरेशननंतर रुग्ण बरा होत असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमुला धन्यवाद दिले आहेत.

मेडिसीन व सर्जरी विभागाचा समन्वय फळाला

शिवाजीची तब्येत अत्यंत नाजूक होती. कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची अवस्था नव्हती. औषधवैद्यकशास्त्र विभागातील किडनीविकार तज्ज्ञ डॉ. कपिल मोरे, सहायक प्राध्यापक डॉ. मोहन भंडारे यांनी डायलीसीस करून रुग्ण नॉर्मल केल्यामुळे रुग्णावर ऑपरेशन करता आले. निष्णात सर्जन डॉ. विद्यासागर केळकर, डॉ.संदीप चव्हाण यांनी अतिशय जोखीम असलेली मूत्रपिंडावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

शिवाजीची केस क्रिटिकल होती. शासकीय रुग्णालयातही अतिशय अवघड आणि जोखमीचे ऑपरेशन होतात, हेच या शिवाजीच्या केसने स्पष्ट केले. रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत.
डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT