Heavy rains wreak havoc in Kinwat taluka; Crops destroyed, floodwaters enter villages
किनवट, पुढारी वृत्तसेवा: शनिवार-रविवारच्या मुसळधार पावसासह ईसापुर धरणाच्या सांडव्याची तब्बल तेरा वक्रद्वारे ५० सेंटीमीटरने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तालुक्यात अक्षरशः हाहाकार माजला आहे. शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्या, जनावरे मृत्युमुखी पडली, गावोगावी पुराचे पाणी शिरले, तर रस्ते आणि पूल उद्धस्त झाल्याने वाहतूक ठप्प झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला असून, या संकटाने नागरिक अक्षरशः बेहाल झाले आहेत.
सिंदगीमोहपूर मंडळातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी आदी पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. सिंदगी येथील शेतकरी संदीप शिवाजी शिरडकर यांच्या गोठ्यातच बांधलेल्या नऊ ते दहा जनावरांचा पुराच्या पाण्याने बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली.
गावात नाल्याचे पाणी शिरल्याने पाणीपुरवठ्याची विहीर कोसळली, तर निचपूर येथील तीन विहिरीही पाण्याच्या तडाख्याने खचल्या. मारेगाव, आंजी, मोहपूर, सिंदगी, धानोरा, दहेली, रामपूर नाल्याच्या पुराचे पाणी गावात शिरले. तसेच निचपूर, रायपूर, बोरगाव व या गावांमध्ये पुराच्या पाण्याचा मोठा लोंढा शिरला. परिणामी गावातील घरांचे नुकसान, पडझड झाली. विहिरीतही पाणी शिरल्याने त्यात गाळ साचला. शेतातील अनेकांचे स्प्रिंकलर सेट वाहून गेले. तर अनेकांचे जनावरांचे गोठे व सौरपॅनल संच उध्वस्त झालेत.