नांदेड

Medha Patkar : ग्रामसभा म्हणजे लोकसभेपेक्षा उंची असलेले सभागृह : मेधा पाटकर

अविनाश सुतार

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा सभागृहापेक्षा उंची असलेले सभागृह म्हणजे ग्रामसभा आहे. यासाठी ग्रामीण जीवन जगविणे व सुधारणे काळाची गरज आहे. सर्व समाजाने बलिदान दिलेला भारत देश आहे. भरताचा तिरंगा वाचवला पाहिजे. म्हणजे पांढरा रंग शांतता, भगवा रंग त्यागाचा आणि हिरवा रंग शेतीचा आहे. त्यामुळे हे तिन्ही रंग वाचवा, म्हणजे आपोआप देश वाचेल, असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनातील अग्रणी नेत्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी करून देशातील विदारक परिस्थितीवर परखड मत व्यक्त केले. Medha Patkar

नायगाव तालुक्यातील देगाव येथे आयोजित शेतकरी, शेतमजूर परिषदेत पाटकर बोलत होत्या. माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, बळवंतराव मोरे, प्रा. बालाजी कोम्पलवार, डॉ. दत्ता मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. Medha Patkar

त्या पुढे म्हणाल्या की, देशात रोज कायदे बदलण्याचे काम सुरु आहे. जनतंत्र व सांविधानावर हमला केला जात आहे. जाती – जातीत विद्वेषाची भावना वाढीस लागतेय. विषमतेची दरी अधिक खोल होतेय. गरीबांच्या जमिनींवर धनदांडगी गिधाडे तुटून पडतायेत. विकासाच्या नावाखाली विनाश करण्यात येतोय. सर्वत्र लुटारुंचा खेळ चाललाय, असा घणाघाती हल्ला केला.

शेतीमालाला हमीभाव नाही. योग्य मजुरी नाही. कामासाठी गाव सोडून माणूस शहरात जातोय. ही स्थिती बदलली पाहिजे. देशात चर्चेविना कायदे बदलले जात आहेत. शेतक-यांच्या बाजूने मात्र कायदे बनत नाहीत. सर्वकाही अदानीला देत आहेत. शहरे दिली आता जंगलेही द्यायची आहेत. त्यामुळे १९८० चा कायदा बदलण्यात आला आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. विकासाच्या नावाखाली धारावीत गोरगरिबांच्या वस्तीच्या जमिनी काढून धनदांडगे करोडो कमावतील, असेही त्या म्हणाल्या. केंद्राच्या फसल बीमा योजनेत विमा कंपन्यांनी पाच वर्षात ४५ हजार कोटी कमावले, असे सांगून केवळ हायवेला प्राधान्य देणाऱ्या शासनाने गावखेडयातील रस्त्यांचेही प्रश्न सोडवावेत, असेही त्यांनी नमुद केले.

" ईश्वर, अल्ला तेरे जहाँ में
नफरत क्यों है, जंग है क्यों…
इस दुनिया के दामन पर…
इंसान के लहु का रंग है क्यों "

ही समर्पक काव्यरचना सादर करुन मेधा पाटकर यांनी आपल्या तडाखेबंद भाषणाचा समारोप केला.
संयोजक बळवंत मोरे यांनी प्रास्ताविक, तर सरपंच डॉ. दत्ता मोरे यांनी आभार मानले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Medha Patkar : उद्धव ठाकरेंच्या संवादी भूमिकेचे जाहीर कौतुक

कोरोना महामारीच्या काळात मजुरांना गावी पोहोचणे सुलभ व्हावे, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बसेसची सुविधा देण्यात आली. संवेदनशील मनाचे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व संवाद साधणारे होते, अशा शब्दांत पाटकर यांनी त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT