Bahava tree flowers pudhari photo
नांदेड

Nanded News: कडक उन्हात बहावा फुलला! पैनगंगा अभयारण्यातील मनमोहक दृश्य देत आहे पावसाळ्याची चाहूल

वैशाखाच्या कडक उन्हात पैनगंगा अभयारण्यात बहाव्याचा सुवर्ण बहर आला आहे. पिवळ्याधमक फुलांनी सजलेला हा बहाव्याचा बहर पावसाळ्याच्या चाहुलीचाही दूत मानला जातो.

पुढारी वृत्तसेवा

Nanded News Bahava tree flowers

उमरखेड : प्रशांत भागवत

वैशाखाच्या कडक उन्हाने धरती तापलेली असताना निसर्ग मात्र आपल्या वेगळ्याच रंगोत्सवात रमलेला दिसत आहे. पैनगंगा अभयारण्यात सध्या 'बहावा'ची झाडे आपल्या सोनेरी फुलांच्या वर्षावाने लक्ष वेधून घेत आहेत. पिवळ्याधमक फुलांचे लोंबते घोस वाऱ्यावर हलताना जणू निसर्गाने सुवर्णहारच घातल्याचा भास निर्माण होतो.

रखरखत्या उन्हाळ्यात बहाव्याचा हा बहर मनाला गारवा देणारा ठरत आहे. पानगळ झालेल्या फांद्यांवर उमललेली पिवळी फुले पाहताना कवींच्या ओळी नकळत आठवतात “रानात सोनं फुललं, झाडांनी स्वप्नं मिरवली...” अशीच काहीशी भावना या बहाव्याकडे पाहताना मनात दाटून येते. जणू निसर्ग स्वतःच सूर्यकिरणांना फुलांच्या रूपात झाडावर उतरवत आहे.

विशेष म्हणजे बहाव्याचा बहर हा पावसाळ्याच्या चाहुलीचाही दूत मानला जातो. एप्रिल ते मे महिन्यात संपूर्ण झाड फुलांनी नटते आणि काही दिवस परिसराला एक आगळे सौंदर्य प्राप्त होते. अनेक पक्षी, मधमाशा आणि फुलपाखरे या फुलांकडे आकर्षित होत असल्याने जैवविविधतेलाही त्याचा हातभार लागतो.

आयुर्वेदात औषधी महत्त्व असलेल्या बहाव्याचे सौंदर्य मात्र साहित्यिकांना नेहमीच मोहून टाकणारे राहिले आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर फुलणारा हा सुवर्णवृक्ष जणू जीवनातील आशावादाचे प्रतीक ठरतो. उन्हाच्या झळांमध्येही फुलत राहण्याचा संदेश देणारा बहावा सध्या परिसराच्या सौंदर्यात भर घालत असून नागरिकांच्या नजरा वेधून घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT