किनवट : गोकुंदा (ता. किनवट) येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत किनवट पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या तपासादरम्यान एकूण सहा गुन्हे उघड झाले आहेत.
दि. 22 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर ठाकरे चौक, गोकुंदा येथील एसबीआय शाखेजवळील दोन एटीएम मशीनपैकी एक मशीन चोरट्यांनी उचलून नेले. या मशीनमध्ये 21 लाख रुपये रोख रक्कम होती. विशेष म्हणजे, मध्यरात्री 1:58 वाजता चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायर कापून फुटेज बंद केले होते. ही चोरी नांदेड-किनवट महामार्गावरील अत्यंत रहदारीच्या ठिकाणी घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या गुन्ह्याचा तपास तातडीने सुरू करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना दिले. अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे आणि सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम हाती घेण्यात आली. 30 मार्च रोजी गोकुंदा एटीएम चोरीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांकडून उमरी आणि नांदेड शहरात संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला.
प्रथम पोलिसांनी संशयित लक्ष्मणसिंग ठाकुरसिंग बावरी (वय 29, व्यवसाय मजुरी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या माहितीच्या आधारे राजूसिंग मायासिंग बावरी (वय 32) आणि महेमूद मौला शेख (वय 28) या दोघांनाही अटक करण्यात आले. चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखविताच तिघांनी गोकुंदा येथील एटीएम चोरीचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर आरोपींकडून 1,22,000 रुपये रोख, चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल, ग्राइंडर मशीन आणि इतर साहित्य असा एकूण 1.94 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसी तपासादरम्यान थोडा हिसका दाखविल्यानंतर आरोपींनी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात मिळून पाच एटीएम चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. यात उमरखेड, रुद्रूर (जि. निजामाबाद), आदिलाबाद आणि कुबेर (जि. निर्मल) येथे त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, नागनाथ तुकडे, मिलींद सोनकांबळे तसेच अंमलदार गंगाधर कदम, रवी बामणे, किशन मुळे, गणेश धुमाळ, तिरुपती तेलंग, संदीप घोगरे, महिला अंमलदार किरण बाबर आणि सायबर शाखेतील राजू सिटीकर, दीपक ओढणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पथकाचे विशेष कौतुक केले असून, पुढील तपास किनवट पोलीस ठाण्यातील पो. निरीक्षक देवीदास चोपडे करत आहेत. या मोहिमेमुळे आंतरराज्यीय एटीएम चोरांच्या टोळीला मोठा धक्का बसला आहे.