उमरखेडः पुढारी वृत्तसेवाः उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, तथा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. १९९० साली जनता दलाकडून आमदार झालेल्या प्रकाश पाटील देवसरकरांनी गेल्या 35 वर्षात पक्षांतराचे अर्धवर्तुळ पूर्ण केले आहे.
पहिल्यांदा १९९२ साली तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे वर विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. देवसरकरच नव्हे तर राज्यातील जनता दलाच्या अकरा आमदारांनी व यवतमाळ जिल्ह्यातील जनता दलाच्या चारही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून संपूर्ण जिल्हा काँग्रेसमय केला होता. सुधाकरराव पायउतार होताच ते पवार गटात सहभागी झाले. परिणामी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश देवसरकरांना सुधाकरराव नाईक यांनीच त्यांच्या उमेदवारीसाठी विरोध केला. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
साधा पोलीस शिपाई असलेले भाजपाचे उत्तम इंगळे हे त्यावेळी आमदार झाले. नंतरच्या काळात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व सहकार क्षेत्रातील निवडणुका,' जय क्रांती पॅनल,' च्या माध्यमातून लढविल्या. उमरखेड तालुक्यात आपले वर्चस्व देखील प्रस्थापित केले. तब्बल तेरा वर्ष वसंत सहकारी साखर कारखान्याचे स्वबळावर अध्यक्षपद भूषवून त्यांनी उमरखेडच्या सहकारक्षेत्रात एकछत्री वर्चस्व निर्माण केले होते. १९९९ राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते शरद पवारांसोबत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बराच काळ घालवल्यानंतर सुद्धा पुसदच्या वर्चस्वाखाली आपले नेतृत्व विकसित होणार नाही. याची खंत त्यांच्या मनात कायम होती.
अशातच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुभाषराव वानखेडे यांचे कडून सूर्यकांत पाटील यांचा झालेला पराभव त्याचे खापर उमरखेडात प्रकाश देवसरकर यांच्या माथी फोडण्यात आले. तेव्हापासून पवारांची नाराजी त्यांना चांगलीच सलू लागली होती. त्यामुळे अखेर प्रकाश देवसरकारांनी थेट शिवसेनेची खासदार भगवा झेंडा हाती घेतला.२०१९ चे हिंगोली लोकसभेचे तिकीट आपल्याला मिळेल. या अपेक्षेत ते होते. परंतु, हेमंत पाटलांनी बाजी मारली. परिणामी प्रकाश देवसरकरांनी पुन्हा पलटी मारून काँग्रेसची वाट धरली. परंतु काँग्रेसमध्ये मधल्या काळात पुला करून बरेच पाणी गेले होते.
काँग्रेसमध्ये असलेल्या पक्षातील प्रस्थापितांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले नाही. त्यांना काँग्रेसमध्ये सतत उपर्याचीच वागणुक मिळाली. त्यामुळे मागील वर्षभरापासून ते काँग्रेसमध्ये असूनही नसल्यासारखेच होते. असेही वर्षाभरापूर्वी त्यांनी भाजपाशी सुत जुळून सहकार क्षेत्रातील सर्व निवडणुका लढविल्या होत्या. आता प्रत्यक्षरीत्या भाजपामध्ये जाहीर प्रवेश करून त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला आहे. येत्या काळात ते कायम भाजपाचा राहतात. की पुन्हा नव्या दिशेने वाटचाल करतात. हे पहावे लागणार आहे.