Islapur ZP school fire incident
ईस्लापूर : येथील जुन्या जिल्हा परिषद (जि. प.) शाळेतील एका खोलीत ठेवलेल्या विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या डेक्सना रविवारी (दि. ९) सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीही आग नियंत्रणात आणली. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ईस्लापुर येथील ही जुनी जिल्हा परिषद शाळा सध्या पडझड झालेल्या अवस्थेत आहे. शाळेच्या दोन ते तीन खोल्या वापरण्यायोग्य असून, त्यापैकी एका खोलीत विद्यार्थ्यांच्या डेक्स ठेवण्यात आले होते. नवीन शाळा इतर ठिकाणी हलविण्यात आली आहे. दरम्यान, या शाळेच्या परिसरात काही व्यक्ती गांजा सेवन करतात, अशी चर्चा स्थानिकांमध्ये असून, त्यातूनच आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील साहेबराव दुरपडे, प्रविण गोस्वामी, अजिम मेकॅनिक, शिवानंद गोस्वामी, लकी जाधव आणि साई जाधव या तरुणांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अग्निशामक दलाची गाडीही घटनास्थळी पोहोचली. दलातील कपिल हिमदे आणि सतिश आडे यांनी आग विझवण्यात सक्रिय मदत केली. स्थानिक प्रशासनाकडून या आगीच्या घटनेची चौकशी सुरू असून, पुढील नुकसानाचा अंदाज घेतला जात आहे. या घटनेमुळे ईस्लापुर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.