नांदेड :अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत नांदेड शहर व जिल्ह्यात हॉटेल, उपहारगृहे आणि अन्न आस्थापनांवर एफडीएने धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन आणि गंभीर त्रुटी आढळल्याने जिल्ह्यातील तीन प्रमुख आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून लाखो रुपयांचा खाद्यतेल व ताडीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नांदेड शहरातील देगलूर नाका येथील हॉटेल सवेरा आणि हॉटेल कविता या दोन्ही ठिकाणी तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता व त्रुटी निष्पन्न झाल्याने त्यांचे अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.
तसेच नवा मोंढा परिसरातील ताडी दुकान क्र. १२ कडे खरेदी बिल अथवा वाहतूक परवाना (ट्रान्सपोर्ट पास) नसल्याने तेथील १५८ लिटर ताडीचा साठा (किंमत ₹७,११०) जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला व या दुकानाचेही लायसन्स निलंबित करण्यात आले.
लाखो रुपयांचे सोयाबीन तेल जप्त
या मोहिमेदरम्यान एमआयडीसी व औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांवरही छापे मारण्यात आले. यात नियमबाह्य साठा आढळल्याने हजारो लिटर रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले:
श्री स्वामी समर्थ ऑईल ट्रेडिंग (एमआयडीसी, नांदेड): ३,१४८ लिटर (₹५,१९,४२०), ज्ञानाई स्पाईसेस (कृष्णूर एमआयडीसी, नायगाव): १,०६१ लिटर (₹३,५३,८००), श्रीनिवास ऑईल अँड फूड्स (हदगाव): १,३६३ लिटर (₹२,४५,३४०), आयुष ओमकार इंडस्ट्रीज (एमआयडीसी, नांदेड): १,०७८ किलोग्रॅम (₹१,८६,४९४)
ही कारवाई सहआयुक्त (छत्रपती संभाजीनगर) श्रीकांत करकाळे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त सु. दा. जिंतुरकर, रा. मा. भरकड यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी सं. वि. कनकावाड, वि. स. लोंढे, अ. मा. तम्मडवार, अ. न. गिरी, शि. व. श्रीरामे आणि अ. के. दुधाटे यांच्या पथकाने केली.
कठोर कारवाईचा इशारा
"जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक, उपहारगृहे आणि अन्न सेवा देणाऱ्या आस्थापनांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या नियमांचे काटेकोर पालन करावे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील," असा थेट इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.