Farmers will receive immediate agricultural advice.
किनवट, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वासार्ह व तात्काळ कृषी सल्ला मिळावा, यासाठी कृषी विभागाने 'महाविस्तार ए आय' हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोबाईल अॅप सुरू केले आहे. हे अॅप किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक माहितीचे चालते-बोलते मार्गदर्शन केंद्र ठरणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी दिली.
महाविस्तार एआय अॅपमध्ये फार्मर आयडीद्वारे लॉगिन करण्याची सुविधा असून, फार्मर आयडी उपलब्ध नसल्यास मोबाईल क्रमांकाच्या सहाय्यानेही नोंदणी करता येते. पेरणीपासून ते काढणी व विक्रीपर्यंत आवश्यक असलेली सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळाल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व खर्च वाचण्यास मदत होणार आहे.
किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून 'महाविस्तार एआय' अॅप मोठ्या संख्येने डाउनलोड करून त्याचा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी केले आहे. हे अॅप शेतीत योग्य निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.