Dattatray Bharne : निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणार! file photo
नांदेड

Dattatray Bharne : निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणार!

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची नांदेडमध्ये आयोजित बैठकीत ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

Farmers will be helped by setting aside the criteria

विशेष प्रतिनिधी

नांदेड : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मराठवाड्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा कठीण परिस्थितीत सर्व निकष बाजूला ठेवून शासन शेतकऱ्यांना मदत करण्यास तत्पर असल्याची ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (दि.१९) येथे दिली.

मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मराठवाड्यातील दुष्काळस्थिती संदर्भात विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'राज्यात अल निनोच्या संकटामुळे पावसात खंड पडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीतील पिके करपून गेली असून उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात दुष्काळाच्या स्थितीची धग मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र शासनाच्या एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता राज्यशासन शेतकऱ्यांना मदत करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांना यापूर्वीच दिले आहे.'

शेतकऱ्यांसाठी हे मोठे संकट आहे. शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. हे संकट मानवनिर्मित नसून नैसर्गिक आहे. अशा संकटांना सामोरे जावे लागणार आहे. शेतकरी रागात बोलला तर त्यांच्याशी सौजन्याने वागा, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे तसेच शासन कुठल्याही पंचनाम्याची वाट न पाहता निर्णय घेणार असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांना नियम व अटी न बघता शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच एनडीआरएफ, राज्य सरकार, पीकविमा या तिन्हींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही भरणे यांनी बैठकीत सांगितले. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, खा. रामराव वडकुते, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची उपस्थिती होती.

काँग्रेसकडून ताफा अडविण्याचा प्रयत्न

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या नांदेड दौऱ्या दरम्यान खा. रवींद्र चव्हाण, आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केली. शासकीय विश्रामगृहावर अनेक शिष्टमंडळांनी भरणे यांना निवेदने सादर केली. मंत्री विश्रामगृहातून बाहेर पडत असताना काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत मंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. या पदाधिकाऱ्यांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. पंचनामे व अन्य तांत्रिक बाबींची वाट न पाहता प्राथमिक अहवालावरूनच शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे भरणे यांनी बैठकीपूर्वीच स्पष्ट केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT