Excessive rainfall in six revenue circles of Nanded!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा पुष्य नक्षत्राचे तब्बल सहा दिवस संपल्यानंतर रविवारी सायंकाळनंतर जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह जलधारांच्या प्रतीक्षेत असलेल्या खरीप पिकांनाही मोठा दिलासा दिला. जिल्ह्यात आतापर्यंत २३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पुनरागमन करताना सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली.
६ जुलै रोजी सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रात सुरुवातीलाच दमदार पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यातही काही भागात वरूणाची करुणा झाली; पण रविवारी सायंकाळी चांगली वातावरण निर्मिती करून आलेल्या पावसाने जिल्ह्यातील १२ तालुके व्यापून टाकले.
मुखेड शहर, या तालुक्यातील चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज व बारुळ, देगलूर आणि या तालुक्यातील खानापूर या सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. चांडोळा येथे तर ९० मि.मी. हून अधिक पाऊस झाला. उर्वरित मंडळांमध्ये ६५ ते ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. १ जून ते २७ जुलै या कालावधीमध्ये जिल्ह्यात ३६८ मि.मी. पावसाची नोंद होते; पण यंदा या कालावधीत २५५ मि.मी. पाऊस झाला असून तब्बल १०० मि.मी.ची तूट दिसून येते.
मागील वर्षी ह्याच काळात ३३५ मि.मी. पाऊस झाला होता. पुष्य नक्षत्र २० जुलै रोजी सुरू झाले; पण मागील पाच-सहा दिवस पाऊस गायब झाल्यामुळे सर्वत्र चिंतेचे ढग दाटलेले होते. खरीप पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा होती. त्यानुसार रविवारी झालेल्या पावसाने चांगला दिलासा दिला असल्याचे शेतीत रमलेले माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी सांगितले.