Umri city electrical shop burglary
उमरी: उमरी शहराच्या मध्यवर्ती भागातील मच्छी गल्लीतील अब्दुल रहीम यांच्या नांदेड इलेक्ट्रिकल दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील आठ एलईडी, दोन मिक्सर व इतर इलेक्ट्रॉनिक सामान असा एकूण एक लाख रुपयांचे ईलेक्टीकल सामान चोरून नेले. चोरी करताना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.२४) पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे.
अज्ञात दोन चोरट्यांनी आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास नांदेड इलेक्ट्रिकल दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कुलूप तोडताना त्यांनी बाहेरचा कॅमेरा फोडला. मात्र दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले आहेत.
नवी कोरी असलेली लाल रंगाची दुचाकी (नंबर प्लेट नसलेली) शंभर फुटाच्या अंतरावर उभी केली आणि दुकानातील एलईडी, मिक्सर व इतर इलेक्ट्रिकल सामान एका पोत्यात भरून तेथून पलायन केले. चोरट्यांनी केलेल्या या सर्व प्रकाराचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.
उमरी बीटचे जमादार कदम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गेल्या काही दिवसापासून उमरी शहरात चोरीच्या घटनेत वरचेवर वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.