नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सरळसेवेतील सरकारी पदे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा व शाळा समायोजन म्हणजे शाळा बंद करण्याचा निर्णयाच्या विरोधात खासगीकरण, कंत्राटीकरण विरोधी कृती समितीच्यावतीने शुक्रवार (दि.6) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
शहरातील आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून या मोर्चास सुरुवात झाली. आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. सरकारने सरळ सेवेतील विविध पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. शाळा समायोजन म्हणजे एकप्रकारे शाळा बंद करण्याचाच घाट घातला जात असून शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेऊन शिक्षणव्यवस्थेचे धिंडवडे काढण्याचे काम शासनाकडून केले जात आहे.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात मत व्यक्त केले. शाळा बंद करून दारूची दुकाने चालू करणारे सरकार अनैतिक आहे, असे म्हणत अनेकांनी सरकारवर कडाडून टीका केली. युवकांच्या शिक्षण, रोजगाराच्या प्रश्नांना बगल देऊन सरकार आपली जबाबदारी झटकून टाकत आहे, असा आरोपही अनेकांनी यावेळी केला.
या मोर्चात डॉ. हर्षवर्धन दवणे, प्रा. सतीश वागरे, स्वप्नील नरबाग, कैलास वाघमारे, प्रा. जयवर्धन गच्चे, बळवंत शिंदे, अविनाश जाधव, तुषार देशमुख, शकीला शेख, भीमराव सूर्यवंशी यांच्यासह हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.