नांदेड : शहर, ग्रामीण आणि हिंगोली जिल्ह्याला आज शनिवारी सकाळी भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरवून सोडले. सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून गूढ आवाज येत जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून, याचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली, पांग्रा शिंदे गावाच्या उत्तरेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नांदेड शहरासह अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर आणि मुदखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी कामाची लगबग सुरू असतानाच अचानक जमिनीतून मोठा आवाज आल्याने नागरिक घराबाहेर धावत सुटले. काही ठिकाणी घरातील भांडी आणि वस्तू खाली पडल्याच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने कुठेही मोठी पडझड किंवा जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांनी दिला आहे.
प्रशासनाकडून तातडीच्या सूचना: 'अफवांवर विश्वास ठेवू नका'
घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला. "प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे," असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही जनतेला धीर देताना म्हटले आहे की, "भूकंपाचा धक्का सौम्य प्रकारचा असला तरी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जिल्हा आपत्कालीन केंद्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे."
सुरक्षिततेसाठी नागरिकांनी काय करावे?
प्रशासनाने नागरिकांसाठी खालील महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:
पत्रांवरील दगड हटवा: ग्रामीण भागात अनेकांच्या घराच्या छतावर पत्रे स्थिर राहण्यासाठी दगड ठेवलेले असतात. भूकंपाच्या धक्क्याने हे दगड पडून इजा होऊ शकते, त्यामुळे तातडीने ते दगड काढून पत्रे बोल्टने घट्ट करून घ्यावेत.
मोकळ्या जागेचा वापर: पुन्हा धक्के किंवा आवाज जाणवल्यास तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या मैदानावर जमा व्हावे.
लिफ्टचा वापर टाळा: बहुमजली इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अशा वेळी लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करावा.