भोकर : जून महिना सुरू झाला की, पावसाची वाट न पाहता भोकर तालुक्यातील काही भागात धूळ पेरणी केली जाते. मागील चार पाच दिवसांपासून किनी, सोनारी, मोघाळी, नागापूर परिसरातील धूळ पेरणी होत आहे. परंतु, प्रशांत महासागरात एलनिनो सक्रिय होत असल्यामुळे भारताच्या दिशेने येणारे मॉन्सूनचे ढग कमकुवत होत आहेत. जर वेळेवर मोठा पाऊस झाला नाही आणि हलका पाऊस होऊन उघडीप दिली, तर दुबार पेरणीचे संकट उभारणार आहे. याबरोबरच तालुक्यातील शेतकऱ्यांचं जगणं आता निसर्गाच्या हातात असल्याने तोच शेतकऱ्यांचा खरा वाली असणार आहे.
जून महिन्यात कधी पाऊस पडतो तर कधी तो लांबलेला असतो. पाऊस पडला नाही तर शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असतात. साधारण ९० मिमी पाऊस झाला की तो पाऊस पेरणी योग्य असतो.
एकंदरीत तालुक्यातील इतर गावाची पेरणी मोठा पाऊस झाला तरच केली जाते. पण याला अपवाद किनी, कांडली, सोनारी, मोघाळी येथील शेतकरी आहेत. या चार गावपरिसरातील शेतकरी मात्र दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस न झाला तरी धुळ पेरणी करतात.
प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय होत असल्यामुळे भारताच्या दिशेने येणारे मान्सूनचे ढग कमकुवत होत आहेत. यामुळे तापमानात मोठी वाढ होऊन पाऊस लांबण्याची किंवा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना ही काही शेतकरी चक्क निसर्गावर भरोसा ठेवून धुळ पेरणी करत आहेत.
भोकर तालुक्याचे सरासरी पेरणी योग्य क्षेत्र ४९ हजार ४३६ हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी सोयाबीनची होत असते तद्नंतर कापूस लागवड केली जाते. सध्या धूळ पेरणीमध्ये कापसाची लागवड केली जात असून मोठा पाऊस न झाल्याने अंदाजे दोन हजार हेक्टर वर दुबार पेरणीचे संकट उभे राहाणार आहे.