Due to a lack of water, a sweet lime orchard was razed to the ground using a JCB!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता आता सोयाबीन, कापूस, केळी या पिकांपुरती मर्यादित राहिली नसून त्याचा फटका फळबागांनाही बसू लागला आहे. पाण्याअभावी फळबाग जगवणे अशक्य झाल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी दोन एकर मोसंबीची बाग जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. यातून जिल्ह्याच्या बागायती पट्ट्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य समोर आले.
राजेगोरे यांनी सहा वर्षांपूर्वी जुलै २०२०मध्ये दोन एकरावर मोसंबी लागवड केली होती. पहिले दोन वर्ष आंतरपीक घेतल्यानंतर पुढची चार वर्षे या क्षेत्रात कोणतेही पीक घेता आले नाही. सहा वर्षात बागेसाठी दोन लक्ष रुपये उत्पादन खर्च झाल्यानंतर सन २०२६ पहिल्यांदा एक लक्ष रुपये उत्पन्न प्राप्त झाले. यादरम्यांना त्यांना ६४ हजारांचे शासकीय अनुदान प्राप्त झाले; पण सहा वर्षे मेहनत व मोठी गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.
यंदाच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी मोसंबीची झाडे वाळू लागल्याने भविष्यात उत्पन्न मिळण्याची आशा संपुष्टात आल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण बागच काढून टाकण्याचा प्रसंग राजेगोरे यांच्यावर ओढावला.
मोसंबीच्या बागेतून फायदा कमी आणि नुकसानच अधिक झाले आहे. यासाठी दुष्काळ परिस्थिती कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया हनुमंत राजेगोरे यांनी दिली. दुष्काळाचे चटके आता केवळ पारंपरिक पिकांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर वर्षानुवर्षे जपलेल्या फळबागाही पाण्याअभावी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. फळबागांसाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता, पर्याप्त आर्थिक मदत आणि प्रभावी संरक्षणात्मक उपाययोजना केल्या नाहीत, तर मराठवाड्यातील फळबागायत दारांसमोरील संकटही अधिक गंभीर होण्याची भीती आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यात केळीच्या बागा काढून टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली असतानाच आता मोसंबीच्या बहरलेल्या बागाही पाण्याअभावी जमीनदोस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बागायती पट्टयात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून केळी, मोसंबी व इतर फळ बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे टाकले आहे.