दुधना नदी पुलावरून दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.  Pudhari News Network
नांदेड

Dudhana River Flood Water, Selu News : सेलूत दोन दुचाकीस्वार वाहून गेले

सेलू- वालूर रस्त्यावरील राजेवाडी गावाजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

Both were swept away by the current.

सेलू : लोअर दुधना प्रकल्पातून निम्न दुधना प्रकल्पात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे तालुक्यातील राजेवाडी येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पुलावरून दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना मंगळवारी (दि.19) सकाळी घडली.

छबुराव शिवराम जावळे ( 50, रा.गुळखंड, ता.सेलू) व मारुती रामभाऊ हरकळ ( 5,रा.वालूर,ता.सेलू) असे पाण्यात वाहून गेलेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्हयात पावसाने हाहाकार उडवलेला आहे. या पावसाच्या जोरामुळे नदी व नाले तूुडूंब भरून वाहत असल्याने शेतशिवारांत पाणी साचून पिकांचेही अतोनात नुकसान झालेले आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांच्यासह महसूल व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रवाहित पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहून गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

निम्न दुधना धरणाचा पाणीसाठा 70 टक्क्यांवर

परतूर : मागील दोन दिवसांपासून निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी 7 वाजेच्या प्रकल्प अहवालानुसार मागील 24 तासात सरासरी 2 हजार 37 क्युसेक दराने पाण्याची आवक सुरू झाली आहे.

344 दलघमी एवढी साठवण क्षमता असणार्‍या प्रकल्पात सध्या 269 दलघमी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पातील एकूण जिवंत साठा 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रकल्प परिसरातील बाधित जमिनीचे भूसंपादन होई पर्यंत प्रकल्पात 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठवण्यात मनाई असल्याने प्रकल्प प्रशासनाने पाण्याच्या विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे 0.20 मीटरने उघडण्यात आले आहेत. सकाळी 9 वाजता पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. चारही दरवाजांमधून 2638 क्युसेक दराने दुधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याची आवक विचारात घेतला पाण्याचा विसर्ग वाढविण्याची अथवा कमी करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रकल्प प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT