नांदेड

Nanded Hospital News : नामकरणापूर्वीच झालेली ‘कोवळी पानगळ’ दुर्दैवी : डॉ. अभय बंग

दिनेश चोरगे

नांदेड : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान मृत पावलेल्या २४ रुग्णांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश असल्याची बाब सोमवारी समोर आली. नामकरणापूर्वीच झालेली ही कोवळी पानगळ पाहून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी शोकसंवेदना व्यक्त करतानाच शासनाने मृत्यूच्या या मालिकेतून काही बोध घ्यावा आणि ताबडतोब व्यवस्थात्मक सुधारणा केल्या पाहिजेत असे बोलही सुनावले आहेत.

वरील कालावधीत मृत पावलेल्या रुग्णांची नावे आणि त्यांच्या मृत्यूचे कारण महाविद्यालयाच्या प्रशासनाने सोमवारी सायंकाळनंतर अधिकृतपणे जाहीर केले. मृत पावलेल्या बालकांमधील ११ जण १ ते ४ दिवस या कालावधीतील होते. जन्मानंतर त्यांचा लगेचच मृत्यू व्हावा ही बाब अतिशय वेदनादायी व दुर्दैवी असल्याची भावना डॉ. बंग यांनी गडचिरोली येथून बोलताना व्यक्त केली.

डॉ. बंग म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशाच्या अन्य भागांतही मागील काळात शासकीय रुग्णालयांमध्ये अचानक अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना आपण बघितल्या आहेत. अशा घटना घडल्यानंतर शासनाकडून चौकशी केली जाते आणि कोणावर तरी खापर फोडले जाते, पण मूळ समस्येला कोणीही हात घालत नाही आणि कायमस्वरूपी उपाय योजिले जात नाहीत, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. नांदेडमधील घटना आपल्याला प्रसारमाध्यमांतून समजली. २४ तासांत झालेल्या मृत्यूंमध्ये कुठे हेळसांड झाली का, उपचार आणि व्यवस्थेमध्ये काही दोष होते का, याची सखोल चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, अलीकडच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे जिल्हा रुग्णालयांकडे रुग्णांचा ओघ वाढलेला आहे, ही चांगली बाब असली, तरी वाढत्या रुग्णसंख्येबरोबर तेथील व्यवस्थेच्या बळकटीकरणाला प्राधान्य देण्याची गरज असली, तरी दुर्दैवाने तसे होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्था सुसज्ज करण्यावर शासनाने भर दिला, तर जिल्हा रुग्णालयांवरील ताण काही अंशी कमी करता येईल.

SCROLL FOR NEXT