सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगाला जिल्हाधिकाऱ्यांची शेताच्या बांधावर जाऊन भेट! file photo
नांदेड

Nanded News : सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगाला जिल्हाधिकाऱ्यांची शेताच्या बांधावर जाऊन भेट!

ताकबीडमध्ये शेताच्या बांधावर जाऊन राहुल कर्डिले यांनी घेतला प्रत्यक्ष आढावा; अचूकता व पारदर्शकतेवर भर

पुढारी वृत्तसेवा

District Collector visits the field to inspect the soybean crop harvesting experiment!

नायगाव : बाळासाहेब पांडे खरीप हंगामातील पिकांची प्रत्यक्ष उत्पादकता अचूकपणे निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पीक कापणी प्रयोगांना जिल्ह्यात वेग आला असून, या प्रयोगांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता राखण्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विशेष भर दिला आहे. नायगाव तालुक्यातील ताकबीड येथे शेतकरी सोनी सतीश टेकाळे यांच्या गट क्रमांक १८३ मधील सोयाबीन पिकावर घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाची जिल्हाधिकारी कर्डिले यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, निवडण्यात आलेले क्षेत्र, पिकाची सद्यस्थिती तसेच उत्पादकतेच्या नोंदीबाबत सविस्तर माहिती घेतली. महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या समन्वयातून निर्धारित निकषांनुसार हे प्रयोग पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अचूक नोंदींवर भर

खरीप हंगामातील विविध पिकांची वस्तुनिष्ठ उत्पादकता निश्चित करण्यासाठी नियोजित पद्धतीने पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात. या प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीच्या आधारे संबंधित महसूल मंडळातील पिकांची सरासरी उत्पादकता निश्चित केली जाते. त्यामुळे पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पीक नुकसान आणि शासनाच्या विविध मदतीचे निर्धारण करताना या नोंदींना महत्त्व असते.

प्रयोगाची अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर उपस्थित राहून पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्या आहेत. तसेच पीक कापणी प्रयोगासाठी निवडलेल्या शेतगटांमध्ये प्रयोग पूर्ण होण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी पीक कापणी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

दुष्काळसदृश परिस्थितीत प्रयोगांचे महत्त्व वाढले

यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा खंड, पिकांची वाढ आणि प्रत्यक्ष उत्पादकता यांचा पिकांवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पीक कापणी प्रयोगातून मिळणारी वस्तुनिष्ठ आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पादकतेच्या आधारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई तसेच नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत शासनाच्या प्रचलित निकषांनुसार मदतीचे निर्धारण केले जाते. त्यामुळे यंदाच्या प्रयोगांकडे शेतकऱ्यांचेही विशेष लक्ष लागले आहे.

शेताच्या बांधावर जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मोटारसायकल सफर!

ताकबीड येथील शेतांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रत्यक्ष पीक पाहणीचा अनुभव पीक कापणी प्रयोगाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटारसायकलवरून परिसरातील विविध शेतगटांना भेट दिली. मार्गातील शेतांमधील सोयाबीनसह विविध पिकांची वाढ, पावसाचा परिणाम आणि पिकांची सद्यस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. केवळ निवडलेल्या शेतातील प्रयोगाची पाहणी न करता परिसरातील एकूण पीक परिस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून विविध बाबींची माहिती घेत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेतली. त्यांच्या या क्षेत्रभेटीमुळे पीक कापणी प्रयोग निर्धारित कार्यपद्धतीनुसार आणि गांभीर्याने पार पाडण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे स्पष्ट झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

पीक कापणी प्रयोगावेळी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी अजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नायगावच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते, नायगावचे तालुका कृषी अधिकारी दिपेश देवरे यांच्यासह महसूल, ग्रामविकास व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, पिकाची स्थिती आणि उत्पादकतेशी संबंधित विविध बाबींची पाहणी केली.

‘नोंदी वस्तुनिष्ठ असाव्यात’

पीक कापणी प्रयोगातून मिळणारी आकडेवारी शासनाच्या विविध योजना, पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतीच्या निर्धारणासाठी महत्त्वाची असल्याने प्रत्येक प्रयोग अचूक, पारदर्शक व वस्तुनिष्ठ पद्धतीने पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने परस्पर समन्वयाने काम करून प्रत्यक्ष क्षेत्रातील परिस्थितीची अचूक नोंद करावी, यावरही त्यांनी भर दिला. यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच संबंधित विभागांचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT