Nanded Illegal Sand Mining
धर्माबाद: गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना रेतीची चोरी करणाऱ्या तस्करांविरुद्ध धर्माबाद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन हायवा गाड्यांसह एकूण २८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर कडक निर्बंध असतानाही, काही तस्कर छुप्या मार्गाने सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० फेब्रुवारी रोजी गोदावरी नदीच्या पुलावर नाकाबंदी करण्यात आली होती.
पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून खालीलप्रमाणे कारवाई केली:
पहिली कारवाई: सिरसखोड जुने गाव परिसरात दुपारी हायवा (क्र. TG-16-T-1280) पकडण्यात आला. यामध्ये सुमारे पाच ब्रास लाल रेती भरलेली होती.
दुसरी कारवाई: दिग्रस शिवारातील गोदावरी पुलावर दुसरा हायवा (क्र. MH-26-H-3426) ताब्यात घेण्यात आला.
अटक/गुन्हे: चालक शेख मौलासाब नशीब साब (वय ४२, रा. कारला, ता. बिलोली) आणि जय मारुती देविदास आयतोड (वय २१, रा. रावणगाव, ता. भोकर) यांच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर, पोलीस उपनिरीक्षक बसवंत मुत्त्यपोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. मुस्तापुरे, पोलीस हवालदार, कॉन्स्टेबल आणि होमगार्ड यांच्या पथकाने केली.