धर्माबाद : धर्माबाद-बेलूर मार्गावरील पायोनियर कंपनीजवळ गुरुवारी (दि. १२ मार्च) दुपारी तीन वाजेच्या सुमारास क्रूझर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात नायगाव (ध.) येथील दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरी विठ्ठल मदनुरकर (वय ४०) आणि त्यांचे चुलत भाऊ विठ्ठल लिंगन्ना मदनुरकर (वय ४९, दोन्ही रा. नायगाव ध.) हे दुचाकीवरून जात असताना, समोरून येणाऱ्या क्रूझरने (क्रमांक MH 26 AF 2920) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पंढरी मदनुरकर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर गंभीर जखमी झालेले विठ्ठल मदनुरकर यांना तातडीने धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी निजामाबाद येथे हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, निजामाबादला नेत असताना वाटेतच विठ्ठल यांचीही प्राणज्योत मालवली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष संगेवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी अपघातग्रस्त क्रूझर आणि दुचाकी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.