विशेष प्रतिनिधी
नांदेड : कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ६ वर्षांपूर्वी विशेष बाब म्हणून शासनाने ज्या निकषांनुसार आर्थिक आणि अन्य मदत केली होती, त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील तसेच नायगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करून शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये मघा नक्षत्रादरम्यान नायगाव मतदारसंघासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात झालेली अतिवृष्टी, गोदावरी आणि अन्य नद्यांना आलेला पूर यामुळे खरीप पिकांसह पशुधन आणि अन्य मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधव उद्धस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आ. राजेश पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफियत त्यांच्या कानी घातली.
भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने संकटकाळात आपत्तीग्रस्तांना भरीव मदत करण्याची भूमिका वेळोवेळी घेतली होती. २०१९ साली कोल्हापूर जिल्ह्यातही भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा शासनाने स्वतंत्र आदेश जारी करून त्या भागातील शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत केली होती. नांदेड जिल्ह्यातही आता तशीच वेळ आली असून शासनाने कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी आ. पवार यांनी आपल्या निवेदनात केली.
नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या बहुतांश भागातून गोदावरी नदी वाहते. याच नदीवर तेलंगणामध्ये असलेल्या प्रकल्पांच्या बॅकवॉटरचा फटका धर्माबाद व इतर भागातील शेतीला बसलेला आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे आपल्या मतदारसंघातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधव हताश झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची अवस्था नापीक झाली आहे. याकडे पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या विषयात तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले आहेत.