उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी देगलूर नगर परिषदेच्या शिष्टमंडळासह मुंबईत भेट घेतली. pudhari photo
नांदेड

Sunetra Pawar : शासनाच्या तिजोरीत खडखडाट; कामांसाठी निधीच नाही!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे देगलूरच्या शिष्टमंडळाकडे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, विशेष प्रतिनिधी :भाजपाच्या मित्रपक्षांच्या ताब्यातील नगर परिषदांना जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याच्या मागणीवर पालकमंत्री अतुल सावे यांनी हात वर केल्यानंतर शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही जिल्ह्यातील देगलूर नगर परिषदेस निधी देण्याच्या मागणीवर असमर्थता दर्शविली आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद असा देगलूर पालिकेचा लौकिक असून या संस्थेत राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाची सत्ता आहे. याच पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देगलूरच्या एका शिष्टमंडळासह सुनेत्रा पवार यांची मंगळवारी सकाळी मुंबईमध्ये भेट घेतली. या भेटीत नगर परिषद प्रतिनिधींनी देगलूर शहरातील विकास कामांसाठी निधीची मागणी करणारे निवेदन श्रीमती पवार यांना सादर केले. तसेच त्यांना देगलूर भेटीचे निमंत्रणही देण्यात आले.

शिष्टमंडळाची निधीची मागणी पाहून श्रीमती पवार यांनी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना यासाठी शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडला असल्यामुळे नगर परिषदांना सध्या निधी देता येणार नाही, असे स्पष्ट करतानाच श्रीमती पवार यांनी केंद्र सरकारच्या नव्या योजनेतून निधीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला वरील शिष्टमंडळास दिला.

नांदेडमधील भाजपा नेते खा.अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, माहूर आदी नगर परिषदांच्या नगराध्यक्षांना सोबत घेऊन अलीकडेच पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेतली होती. या सर्व नगराध्यक्षांनी स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारास मदत व सहकार्य केल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली, तरी या नगर परिषदांना निधी देण्याच्या मागणीवर पालकमंत्र्यांनी हात वर केल्यामुळे सार्‍यांचीच निराशा झाली होती.

माजी उपमुख्यमंंत्री दिवंगत अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खात्याचा पदभार होता. या नात्याने त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करण्याची भूमिका घेतली होती; पण त्यांच्या पश्चात हे महत्त्वाचे खाते आता मुख्यमंत्र्यांकडे गेले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कोंडी झाली असली, तरी आ.चिखलीकर यांनी देगलूरच्या शिष्टमंडळाला सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पहिल्या भेटीत विफल ठरल्याचे सांगण्यात आले.

नांदेड दौरा लांबणीवर

पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार १२ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये येणार होत्या. त्या दृष्टीने नियोजनही केले जात होते; परंतु मनोज जरांगे यांचे उपोषण व संभाव्य आंदोलनामुळे निर्माण झालेली अनिश्चित परिस्थिती पाहून श्रीमती पवार यांनी आपला नांदेड दौरा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याच दौर्‍यात देगलूर येथे त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा आणि काही शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार होते. जरांगे यांच्या उपोषणाचा विषय संपल्यानंतर पुढील तारीख देण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT