Controversial worker of Mudkhed visits Chief Minister on 'Varsha'
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : भोकर मतदारसंघातील मुदखेड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळूचा उपसा आणि अनधृिकत साठा याबद्दल ओरड सुरू असताना, अशा व्यवहारातील एका माहीर आणि वादग्रस्त कार्यकर्त्यास भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी नेल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवरून समोर आले आहे.
भाजपा नेते, खासदार अशोक चव्हाण, या पक्षाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर शुक्रवारी मुंबईमध्ये होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली तेव्हा मुदखेडमधील वादग्रस्त कार्यकर्ताही त्यांच्यासोबत होता. मागील महिन्यात याच कार्यकर्त्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही भेट घडवून आणण्यात आली होती.
वरील भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर मुदखेड तहसील कार्यालयातील काही जुन्या नोंदी बाहेर आल्या. त्यानुसार गेल्यावर्षी जून महिन्यामध्ये मौजे वासरी आणि तलाठी सज्जा शंखतीर्थ याठिकाणी वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये आढळून आलेल्या वाळू साठ्यांना अनधिकृत (अवैध) ठरवण्यात आले होते.
शंखतीर्थ येथील एका साठ्यामध्ये वरील कार्यकर्त्याच्या नावाची नोंद झाली होती. तेथे तब्बल ६० ब्रास साठा आढळून आल्यानंतर संबंधितास १२ लाख ८५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. शंखतीर्थ येथून तब्बल १८ लाखांचा वाळू साठा जप्त झाला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक ती कारवाई केली होती.
मागील वर्षी झालेल्या वरील कारवाईच्या माहितीला तहसील कार्यालयातील संबंधित नायब तहसीलदारांकडून दुजोरा मिळाला. ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांनी भोकरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले असले, तरी अद्याप त्यांना क्लिनचिट मिळाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जून महिन्यामध्ये खा. अशोक चव्हाण यांनी एका व्हीडीओच्या माध्यमातून वरील कार्यकर्त्यास वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या, हे विशेष.