Container truck rams into a private bus near Armoor; two women from Kinwat killed
किनवट, पुढारी वृत्तसेवा: हैदराबाद येथील चिन्ना जियार स्वामी यांच्या दर्शनासाठी किनवटहून निघालेल्या महिलांच्या ट्रॅव्हल्सला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर आरमूरजवळ गुरुवारी (दि. १३) सकाळी भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने महामार्गाच्या कडेला उभी असलेल्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिली.
या दुर्घटनेत ट्रॅव्हल्समधून खाली उतरलेल्या माधवी किरण किनवटकर आणि सुजाता अशोक नेम्मानीवार या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनीता प्रकाश गुंटापेल्लीवार व मनिषा भास्कर नेम्मानीवार या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
किनवट येथील सुमारे ६० महिला दोन खासगी ट्रॅव्हल्समधून चिन्ना जियार स्वामी यांच्या दर्शनासाठी हैदराबादच्या दिशेने निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान एका ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने ती राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला थांबविण्यात आली होती. टायर बदलण्याचे काम सुरू असताना, काही महिला ट्रॅव्हल्समधून खाली उतरल्या होत्या.
त्याचवेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. कंटेनरच्या धडकेने ट्रॅव्हल्सला जोरदार हादरा बसला. यावेळी खाली उतरलेल्या दोन महिला ट्रॅव्हल्सखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर निझामाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अपघातात काही महिलांना किरकोळ दुखापत झाल्याचेही समजते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, दुर्घटनेची वार्ता किनवटमध्ये पोहोचताच शहरावर शोककळा पसरली. दर्शनासाठी आनंदाने निघालेल्या महिलांच्या यात्रेला भीषण अपघाताचे गालबोट लागल्याने किनवटकरांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेने मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.