Chikhlikar's expelled worker participates in NCP Youth Congress meeting
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी येथील एका स्थानिक कार्यकर्त्यास पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे पंधरवड्यापूर्वी येथे जाहीर केले होते. पण हा कार्यकर्ता पक्षामध्ये सक्रिय असून मंगळवारी मुदखेड येथे झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीस हजर राहिल्याचेही दिसून आले.
आमदार चिखलीकर यांनी आपल्या स्थानिक कार्यालयातील एका पक्षप्रवेश कार्यक्रमात वेगवेगळ्या स्वरुपाच्या ३० गुन्ह्यांची नोंद असलेल्या अन्वर अली खान यास पक्षात दाखल करून घेतल्यानंतर गेल्या महिन्यात हे प्रकरण येथे गाजले होते. भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनीही त्यावरून चिखलीकरांना टोला लगावला होता.
अन्वर अली खान यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याची शिफारस ज्या कार्यकत्यनि आपल्याकडे केली त्यालाही पक्षातून काढून टाकण्यात आले आहे, असे चिखलीकर यांनी २० मे रोजी येथे जाहीर केले होते. शिफारस करणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर घेतले नव्हते; पण पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव बच्चू यादव यांनी अन्वर अली खान याची शिफारस केल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. या प्रकरणात चिखलीकर यांनी आपल्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिल्यानंतर हा विषय तेथेच थांबला होता.
दरम्यान ३ जून रोजी मुदखेड येथे झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये इतर पदाधिकाऱ्यांसोबत बच्चू यादव सहभागी झाल्याचे दिसून आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच स्थानिक कार्यकर्त्याने बच्चू यादव यांच्या उपस्थितीकडे समाजमाध्यमांतून लक्ष वेधले असून त्यावर आता पक्षामध्ये चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगरातील काही पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बच्चू यादव यांना पक्षातून काढून टाकण्यासंदर्भात पक्षाच्या प्रदेश शाखेकडून किंवा ओबीसी विभागाच्या अध्यक्षांकडून लेखी पत्र आलेले नाही. तांत्रिकदृष्ट्या ते अद्यापही पक्षात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या येत्या १० जूनच्या स्थापना दिनानिमित्त पुणे येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नांदेडमधील संपर्क कार्यालयात शुक्रवारी दुपारी १.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.