Chakkajam agitation by farmers for loan waiver and other demands
हिमायतनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. पावसाळी अधिवेशन संपले तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने निर्णय घेतला नसल्यामुळे प्रहार संघटनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.२४) भोकर-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारी फाट्यावर चक्कजाम आंदोलन केले.
हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून कर्जमाफीसह शासनाच्या विविध लाभापासून वंचित रहावे लागत आहे. गुरूवारी सकाळी सोनारी फाट्यावर मुख्य रस्त्यावर शेतकऱ्यांनी चक्क जाम आंदोलन केले असून, हे आंदोलन तब्बल चार तास सुरू होते.
राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यासाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले. त्यानंतर पाई यात्रा देखील काढली. मात्र, शासनाने दखल घेतली नसल्याने हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवित चक्का जाम आंदोलन केले आहे. आंदोलनात सोनारी, करंजी, जवळगाव, पोटा, कामारी, वाळकेवाडी, दुधड यासह परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.