हिमायतनगर : अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेल्या. बोरगडी सज्जातील तलाठ्यांकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून जाणीवपूर्वक शंभर टक्के खरडून गेले तरी 55 ते 60 टक्के नुकसान दाखवून शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात खोडा घातला असल्याने सदरील तलाठ्यांना निलंबित करून शेतकऱ्यांचे उर्वरित क्षेत्राचे अनुदान जमा करण्याची मागणी उबाठा गटाचे तालुका प्रमुख संजय काईतवाड यांनी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नदी काठासह नाल्या काठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या तर अनेक जमिनीतील सोयाबीन कापूस जाग्यावर काडीमोड झाले असल्याचे विदारक चित्र आहे. बोरगडी सज्जात येणाऱ्या बोरगडी,बोरगडी तांडा,कारला, सिबदरा या गावातील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तरी देखील बोरगडी सज्जाचे तलाठी केशव थळंगे यांनी शेतकऱ्यांचे नुकसान क्षेत्र शासनाने दिलेल्या क्षेत्रापेक्षाही कमी क्षेत्र दाखवून शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 55 ते 60 टक्के नुकसान दाखवून तसा अहवाल शासनाकडे सादर केला आणी याद्या प्रसारीत केल्या त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तलाठ्यांच्या विरोधात खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्या समक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे तक्रार केली होती त्यानंतर तलाठ्यांना बोलावण्यात आले पण तलाठी उपस्थित राहिले नाही त्यामुळे खा.आष्टीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचे नुकसान खपवून घेणार नाही अशा अधिकाऱ्यांना निलंबित करा अशा सूचना केल्या होत्या.
गुरुवारी तहसीलदार यांच्याकडे या सज्जातील शेतकऱ्यांनी तलाठ्यांच्या विरोधात निवेदन दिले यामध्ये शंभर टक्के नुकसान असताना तलाठ्यांकडून शेतकऱ्यांचे क्षेत्र जाणीवपुर्वक कमी दाखवले आहे.या बाबतीत शेतकऱ्यांनी तलाठ्यांना विचारणा केली असता शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत पुढील येणार अनुदान देखील कमी होईल अशी धमकी देत असल्याची तक्रार शिवसेना तालुकाप्रमुख संजय काईतवाड यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे केली आहे.
अगोदर अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असुन महसूल च्या जबाबदार तलाठ्यांकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्याचे क्षेत्र कमी दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली या तलाठ्यांना तातडीने निलंबित करावे व या सज्जाचा पदभार हा दुसऱ्या तलाठ्यांकडे सोपवावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काईतवाड , अरविंद पाटील जाधव यांनी लेख निवेदनाद्वारे केली आहे.कारला ,बोरगडी,सिबदरा या गावातील शेतकऱ्यानी देखील तलाठ्यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे लेख निवेदन दिले आहे.
सदरील तलाठ्यांनी किनवट तालुक्यात असताना शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून इतरांच्या नावे अनुदान दिले होते त्यामुळे दोन वर्षांपूर्वी याच तलाठ्यांना निलंबित करून हिमायतनगर दिले होते त्यानंतर देखील या तलाठ्यांनी बोरगडी सज्जाचा पदभार स्वीकारला आणि या सज्जातील शेतकऱ्यांच्या वारसाचे जमिनीचे फेरफर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लूट केली यासह अनेक कारनामे केले असुन तातडीने निलंबित करा अशी मागणी केली आहे.